नांदेड ः नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांची निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती करतानाच निवडणूक प्रमुखपदी ज्येष्ठ नेते खा.अशोक चव्हाण यांची स्वतंत्र पत्राद्वारे नियुक्ती केली असून आधीचे निवडणूक प्रमुख खा.डॉ.अजित गोपछडे यांना मनपा निवडणुकीच्या प्रकियेतून हटविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
प्रदेश भाजपाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आपल्या प्रत्येक संघटनात्मक जिल्ह्यासाठी निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा 5 नोव्हेंबर रोजी केली होती. त्यानुसार नांदेड जिल्ह्याचे प्रभारी म्हणून खा.अशोक चव्हाण यांच्या नावाची घोषणा झाली. नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण या संघटनात्मक जिल्ह्यांचे प्रमुख म्हणून आ.श्रीजया चव्हाण व आ.राजेश पवार यांची नियुक्ती झाली तर नांदेड शहर जिल्ह्याचे प्रमुख म्हणून खा.अजित गोपछडे यांचे नाव जाहीर झाले.
जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकीत खा.गोपछडे यांनी लक्ष घातले नव्हते आणि वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये सहभागही नोंदविला नव्हता. या निवडणुकांसाठी मतदान झाल्यानंतर भाजपामध्ये नांदेड-वाघाळा मनपाच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यानंतर पक्षाचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर व इतर दोन प्रतिनिधींनी इच्छुकांच्या मुलाखतींचे सत्र पंधरवड्यापूर्वी सुरू केल्यानंतर खा.गोपछडे यांच्या कार्यालयाने त्यांच्या संपर्क कार्यालयात 13 व 14 डिसेंबर रोजी इच्छुकांच्या मुलाखती होतील, असे जाहीर केल्यामुळे पक्षातील बेबनाव, संघटनात्मक गोंधळ समोर आला. त्यावर वेगवेगळ्या माध्यमांमध्ये उलटसूलट चर्चाही झाली. पण पक्षातर्फे त्यावर कोणीही स्पष्टीकरण दिले नव्हते.
भाजपाच्या सर्वच इच्छुकांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती द्याव्या लागल्यामुळे पक्षातील शिस्त बिघडल्याचे निदान झाले. खा.अशोक चव्हाण व त्यांच्या यंत्रणेने सर्व प्रक्रिया नियोजनपूर्वक करून आवश्यक ती माहिती प्रदेश कार्यालयाकडे पाठवूनही दिली. मागील आठवड्यात खा.अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षांशी थेट संपर्क साधून स्थानिक पातळीवरील काही अनाकलनीय बाबी त्यांच्या कानी घातल्यानंतर प्रदेश कार्यालयाने निवडणूक प्रभारीपदी मंत्री पंकजा मुंडे यांची नियुक्ती केली. त्याआधी खा.चव्हाणही निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
नव्या नियुक्तीमुळे दोन प्रभारींत कोण भारी, असा प्रश्न येथे उपस्थित झाला होता. आता गोपछडे यांची निवडणूक प्रमुखपदावरून अप्रत्यक्षपणे उचलबांगडी झाल्यामुळे नांदेडमध्ये अशोक चव्हाणच भारी, असा संदेश नव्या नियुक्तीतून गेला आहे.
‘एबी फॉर्म’ राजूरकरांच्या स्वाक्षरीनेच !
खा.अजित गोपछडे यांचा नांदेड मनपा निवडणुकीतील संघटनात्मक बाबींमध्ये आता संंबंध राहिलेला नाही, असे भाजपाच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने शनिवारी स्पष्ट केले. असे काही बदल अन्य जिल्ह्यांतही करण्यात आले आहेत. नांदेड-वाघाळा मनपाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार निश्चित झाल्यानंतर त्यांना पक्षाच्या अधिकृत उमेदवारीचा ‘एबी फॉर्म’ महानगरप्रमुख अमरनाथ राजूरकर यांच्या स्वाक्षरीने प्रदान केला जाणार असल्याची माहितीही समोर आली. त्यांतून मनपा निवडणुकीची सारी सूत्रे खा.चव्हाण यांच्याकडे गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे.