बिलोली ः सावळी रोड परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्यावर बिलोली पोलिसांनी धाड टाकून तब्बल 16 लाख 68 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच जुगारांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, महागडे मोबाईल आणि दुचाकी जप्त करण्यात आली असून जुगार चालकासह इतर पंधरा पांढरपेशी जुगारी फरार झाले आहेत.
सोमवारी (2 फेब्रुवारी) रात्री सावळी रोडवरील प्रताप अंकुशकर यांच्या शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये काही लोक बेकायदेशीररित्या अंदर-बाहेर नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती विशेष पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सूरजकुमार तिडके आणि त्यांच्या पथकाने रात्री 11:55 च्या सुमारास अचानक छापा टाकला.
पोलिसांनी रसुल शेख अहमद शेख वय 45, रा. बिलोली, बोझा चंद्रशेखर गौड वय 50, रा. मोसरा, जि. निजामाबाद, आकाश विठ्ठल कांबळे वय 33, रा. बोधन, जि. निजामाबाद, कामी रेड्डी रमन्ना रेड्डी वय 35, रा. सालुपरा, जि. निजामाबाद, शेख नबी मिनुमियाँ वय 32, रा. सालुरा, जि. निजामाबाद यांना ताब्यात घेतले. तर काही आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
पोलिसांनी घटनास्थळावरून 16 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये रोख रक्कम: 3 लाख 6 हजार रुपये, महागडे 5 स्मार्टफोन, एक विना क्रमांकाची मोटारसायकलचा समावेश आहे.
पोलीस उपनिरीक्षक सूरजकुमार तिडके यांच्या फिर्यादीवरून बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने पार पाडली. शहरात अवैध धंदे चालवणाऱ्यांचे या कारवाईमुळे धाबे दणाणले आहेत.
पोलिसांचे अभय!
छाप्यामध्ये जुगार चालकासह 15 पांढरपेशी जुगारी फरार झाले.यात जुगार अड्डाचालक व पांढरपेशी जुगाऱ्यांना पळवण्यासाठी व त्यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्यासाठी एका राजकीय पुढाऱ्याने तडजोड केली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पांढरपेशी जुगाऱ्यांना पोलिसांचे अभय मिळत असल्याची बाब समोर येत आहे.