भोकर ः चोरी गेलेल्या एका दुचाकीचा शोध घेत असताना तेलंगणा राज्यासह अन्य ठिकाणी चोरी केलेल्या 34 दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती आंतरराज्य चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांकडून भोकर पोलिसांच्या पथकाने उघडकीस आणली आहे. पोलिसांनी 23 लाख 5 हजार रुपयांच्या 34 दुचाकी जप्त करून तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सोनारी (ता.भोकर) येथील रहिवासी गजानन नागनाथ होनशेट्टे यांची हिरो स्प्लेंडर कंपनीची दुचाकी (एम एच 26, वाय 8173) मागील महिन्यात 30 डिसेंबर रोजी चोरी गेल्याची तक्रार भोकर पोलिसांत दिली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना चोरी गेलेली दुचाकी म्हैसा-भोकर रस्त्यावरून येत आसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पाळत ठेवून पोलिसांनी दुचाकीसह नवीन ऊर्फ मामू नारायण गुदेवार, भीमराव ऊर्फ बाळू किशनराव कदम आणि किरण दारासिंग कदम तिघेही रा.दिवशी (बु. ता.भोकर) यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.
त्यांच्याकडून अधिक माहिती घेत तपास केला असता तेलंगणा राज्यासह विविध ठिकाणी दुचाकी चोरल्याची त्यांनी कबुली दिली. पोलिसांनी चोरलेल्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पो. नि. अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि दिलीप जाधव, राम कराड, पो. कॉ. गुरुदास आरेवार, विवेकानंद गिरी, सुदर्शन एकुलवार, संजय माळकोटे, राम टेकाळे यांनी केली.
13 दुचाकी चोरीचे गुन्हे उघड
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 34 दुचाकींपैकी निजामाबाद, डिचपल्ली, कामारेड्डी, बासरी, नवी पेठ येथील 13 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले.