नांदेड

Nanded News : येळेगाव-माळकौठ्यातील दोन कुटुंबांना रा.काँ.च्या आमदारांचा मदतीचा हात!

स्थानिक नेत्यांकडून सरकारी मदतीवर जोर

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड : भोकर मतदारसंघातील दोन शेतकरी कुटुंबांमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडल्यानंतर त्या भागाशी संबंधित असलेले सत्ताधारी नेते उघड्यावर पडलेल्या कुटुंबीयांसाठी सरकारी मदतीचे घोडे नाचवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाच्या दोन तरुण नेत्यांनी संबंधित कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची तसेच या दोन्ही कुटुंबांना आवश्यक ती मदत करण्याची तयारी दर्शवत मोठा दिलासा दिला.

वरील मतदारसंघातील येळेगाव (ता.अर्धापूर) येथे गुणाजी बापूराव पवार या शेतकर्‍याने जून महिन्यात कर्जबाजारीपणातून आत्महत्या केली होती, तर अलीकडे माळकौठा (ता.मुदखेड) येथील चंद्रकांत दगडूजी शिंदे हा शेतकरीही खाजगी वित्त संस्थेच्या वसुली जाचाचा बळी ठरल्यामुळे जिल्हाभर खळबळ उडाली होती. चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्या आठवड्यात पक्षातर्फे ५ लाखांची मदत दिली होती. दुसर्‍या बाजूला जिल्ह्यात अव्वलस्थानी असलेल्या भाजपा व या पक्षाच्या नेत्यांनी मात्र वैयक्तिक किंवा पक्षीय मदतीच्या बाबतीत हात आखडता घेत या कुटुंबास सरकारी योजनांतून होणार्‍या मदतीचाच गाजावाजा चालवला आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि नव्यानेच विधान परिषदेवर निवडून आलेले प्रतापसिंह पाटील हे दोन तरुण नेते शनिवारी नांदेड जिल्ह्यामध्ये आले होते. आ.पवार यांच्या दौर्‍याची माहिती आधीच जारी झाल्यामुळे भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी सकाळी जिल्हाधिकार्‍यांना सोबत घेत माळकौठा गावातील शिंदे कुटुंबीयांची भेट घेतली. नंतर या कुटुंबातील सदस्यांना शासनाच्या प्रचलित योजनांतून होणार्‍या लाभाची माहिती त्यांनी माध्यमांना घाईघाईने दिली.

तत्पूर्वी आ.रोहित पवार हे उमरखेड, किनवट-माहूर भागाचा दौरा करून मध्यरात्री नांदेडमध्ये आले. सकाळीच त्यांनी आ.प्रतापसिंह पाटील यांच्यासह प्रथम येळेगाव येथील गुणाजी पवार यांच्या कुटुंबीयाची भेट घेतली. या कुटुंबातील चार मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचे आ.पाटील यांनी तेथेच जाहीर केले. नंतर दोन्ही आमदार माळकौठा येथे गेले. तेथील शिंदे कुटुंबाची कैफियत ऐकल्यानंतर या परिवारातील एका मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आ.रोहित पवार यांनी स्वीकारली.

आ.पवार व आ.पाटील यांच्या भेटी दरम्यान येळेगाव येथील गुणाजी पवार यांच्या कुटुंबाने ग्रामसेवकाविरुद्ध गंभीर तक्रार केल्यानंतर आ.पवार यांनी गटविकास अधिकारी तोटावाड यांच्याशी संपर्क साधत संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करण्याची सूचना दिली. या दौर्‍यात आ.पवार यांनी नांदेडमधील मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कारभारावरून अनेक प्रश्न उपस्थित केले. पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या एसआयटीने सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

  • येळेगाव येथील पवार कुटुंबातील चारही मुलींच्या पुढील शिक्षणाच्या प्रक्रियेसाठी समन्वयाची जबाबदारी काँग्रेसचे संदीपकुमार देशमुख व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे यांच्याकडे, तर माळकौठा येथील मुलीच्या शिक्षणाच्या प्रक्रियेच्या समन्वययाची जबाबदारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगावकर यांच्याकडे आ.रोहित पवार यांनी सोपविली. दोन्ही कुटुंबांनी यांच्या संपर्कात राहावे, असे पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT