कळमनुरी ( नांदेड ) : दत्तात्रय बोडखे
आखाडा बाळापूर तालुक्यातील वारंगा, डोंगरकडा, जवळा पांचाळ परिसरात इसापूर धरणाचे पाणी मिळत असल्याने केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतू, यंदा मात्र जूनपासून सातत्याने केळीचे दर घसरत आहेत. सध्या केळीला प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रूपयांचा दर मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. केळीच्या विक्रीतून लागवड खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतातील केळीच्या बागा मोडीत काढण्यास सुरूवात केली आहे.
वारंगा फाटा, डोंगरकडा, जवळा पांचाळ, वडगाव, रेडगाव, वसफळ, डिग्रस, सालापूर, गुंडलवाडी, दांडेगाव यासह या परिसरात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड करण्यात येते. इसापूर धरणाचे मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने मागील अनेक वर्षापासून या परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस शेतीबरोबरच केळीच्या पिकाला प्राधान्य दिले आहे. परंतू, यंदा मात्र केळी उत्पादक शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. जून महिन्यानंतर केळीचे दर सतत कमी होत गेले. सध्या केळीला ५०० ते ६०० रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. या भागातील केळी प्रामुख्याने चंदीगढ, गुजरात, हैदराबाद, करीमनगर या भागात विक्रीसाठी जातात. तेथे सरासरी १५०० ते २५०० रूपये प्रतिकिलोचा दर मिळतो. यंदा मात्र जूनपासून सातत्याने केळीचे दर गडगडले आहेत. परिणामी
उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
सध्या मिळेल त्या भावात केळी उत्पादक आपल्या केळी नांदेड किंवा हैदराबाद येथे पाठवित आहेत. त्यांना प्रतिक्विंटल ५०० ते ६०० रूपयांचा दर मिळत आहे. सध्या व्यापाऱ्यांकडून केळीला मागणी कमी झाली आहे. परिणामी शेतातच केळी पिकून सडून जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या डोळ्यासमोर आपल्या केळीच्या बागा उद्धवस्त होताना पहावे लागत आहे.
माझ्याकडे ६ एकर क्षेत्रावर ८ हजार केळींच्या रोपांची लागवड केली आहे. परंतु सध्या केळीला ५०० पेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळे केळीसाठी केलेला लागवड खर्चही निघणे मुश्किल बनले आहे. माझ्या शेतात झाडालाच केळी पिकून खराब होत आहे. केळीला किमान दिड हजार रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळणे गरजेचे आहे. शासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना विशेष मदत करून दिलासा द्यावा.केळी उत्पादक शेतकरी बालाजी खांडरे, प्रदिप खांडरे, डिग्रस बु.
लागवड खर्च व नफ्याचा ताळमेळ बसेना
केळीसाठी एकरी १४०० ते १५०० रोपे लागतात. यासाठी एकरी एकूण १ लाखाचा खर्च येतो. केळीला सरासरी १५०० ते २००० प्रतिक्विंटलचा दर मिळाल्यास एकरी ३ लाखांपर्यंत उत्पादन निघते. एकरी सरासरी ३० टनापर्यंत केळीचे उत्पादन निघते. परंतु, सध्या केळीला सरासरी ५०० रूपये सरासरी प्रतिक्विंटलचा दर मिळत असल्याने लागवड खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. लागवड खर्च अधिक व दर मात्र कमी मिळत असल्याने यंदा केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.