नांदेड : जिल्ह्यातील पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता सर्व अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत. काही ठिकाणी कामांना अडथळे येत असल्यास पोलीस प्रशासनाची मदत घेऊन कामे वेळेत पूर्ण करावीत. विद्युत जोडणीअभावी रखडलेली कामे तातडीने सुरू करावीत. तसेच पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त धरणांतील १० टक्के अतिरिक्त पाणीसाठा सुरक्षित ठेवावा आणि ऑगस्टपर्यंतच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.
येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अपूर्ण पाणीपुरवठा योजना, शहरी व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि पशुधनासाठी चारा उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन आणि महानगरपालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाणीपुरवठा योजनांच्या रेट्रोफिटिंगच्या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर लवकरच बैठक घेण्यात येईल. पाणीपुरवठ्याशी संबंधित प्रलंबित देयकांसाठी आवश्यक निधीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. या देयकांचा निपटारा करण्यासाठी मुंबई येथे बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे पालकमंत्री श्री. सावे यांनी सांगितले.
निधीअभावी पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक उपाययोजनांमध्ये अडथळे येऊ नयेत, यासाठी महसूल, जलसंपदा विभाग, पोलीस, नगर पालिका, महानगर पालिका आणि जिल्हा परिषद या सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन दुष्काळी परिस्थितीवर मात करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या तसेच पूर्णत्वाच्या टप्प्यात असलेल्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेऊन उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. राज्यस्तरावर प्रलंबित असलेल्या सुधारित पाणीपुरवठा योजना, पाणीटंचाई आराखडा, इसापूर धरणातील उद्भव विहिरीचे काम आणि विद्युत जोडणीची प्रलंबित कामे यांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.