नांदेड : जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून सुरू असलेला अवैध रेतीचा उपसा आणि साठवणुकीविरुद्ध नांदेडच्या विमानतळ पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. ब्राह्मणवाडा ते पाथरड परिसरात राबवलेल्या या मोहिमेत पोलिसांनी एक पोकलेन मशीन, वाळूने भरलेला टिप्पर आणि ६३ ब्रास वाळू असा तब्बल २८ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोदावरी नदीपात्रातून चालणारा बेकायदेशीर वाळू उपसा, पर्यावरणाचा ऱ्हास आणि शासनाचा महसूल बुडवणारे प्रकार समूळ मोडून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी विशेष मोहीम राबवण्याचे कडक निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हेमंत देशपांडे व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत असताना, ब्राह्मणवाडा ते पाथरड जाणाऱ्या रस्त्यावर काही इसम विनापरवाना बेकायदेशीर वाळूचा उपसा करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन ब्राह्मणवाडा ते पाथरड रस्त्यावर अचानक छापा टाकला. तेथे एक टाटा कंपनीचा टिप्पर (क्र. एमएच २६ एडी १२०६) वाळूने भरलेला आढळून आला. पोलिसांनी वाहनचालक दिगंबर माधव सोनटक्के (वय ३२, रा. ब्राह्मणवाडा, जि. नांदेड) याची कसून चौकशी केली असता, त्याच्याकडे रेती उत्खनन, वाहतुकीचा परवाना किंवा कोणतीही रॉयल्टी पावती नसल्याचे स्पष्ट झाले.
तसेच, रस्त्याच्या कडेला टाटा हिताची पोकलेन मशीनच्या साहाय्याने गोदावरी नदीपात्रातून अवैध उपसा करून तब्बल ६० ब्रास वाळूचा साठा विक्रीसाठी रचून ठेवल्याचे निष्पन्न झाले. हा सर्व अवैध वाळू साठा विठ्ठल बालाजीराव मोरे (रा. ब्राह्मणवाडा) याचा असल्याचे चालकाने सांगितले.
या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा रजि. क्र. ५३८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३(५) सह महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम ४८ (७), ४८ (८) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.
विमानतळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामदास शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक हेमंत देशपांडे व अंमलदार तेलंगे, पोवळे, आलेवार, राणे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंद्यांचे उच्चाटन असेच सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.