नांदेड : १९९२ साली अयोध्येतील विवादास्पद वास्तू पाडण्यात आल्यानंतर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी भाजप - संघ परिवारावर कडक शब्दात टीका केली होती. त्यांच्या पश्चात त्यांच्या छायाचित्राच्या साक्षीने त्यांनी वृद्धिंगत केलेल्या शिक्षण संस्थेत संस्थेच्या विद्यमान कारभाऱ्यांनी संघ पदाधिकाऱ्यांचे सहर्ष स्वागत केले.  pudhari photo
नांदेड

Ashok Chavan RSS Event : रा.स्व.संघ पदाधिकार्‍यांसाठी खा.चव्हाणांच्या संस्थेत ‘रेड कार्पेट!’

खा.चव्हाण यांनी संघाला ‘राष्ट्र प्रथम, समाजहित सर्वपरि’ अशी प्रशस्ती बहाल केली.

पुढारी वृत्तसेवा

संजीव कुळकर्णी

नांदेड : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्र निर्मितीशी संबंध काय?’ असा टोकदार सवाल करणार्‍या अशोक चव्हाण यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणातील संघाच्या एका कार्यक्रमात सहभाग नोंदवतानाच संघ पदाधिकार्‍यांच्या स्वागतार्थ ‘रेड कार्पेट’ अंथरल्याचे रविवारी बघायला मिळाले. यानिमित्ताने खा.चव्हाण यांनी संघाला ‘राष्ट्र प्रथम, समाजहित सर्वपरि’ अशी प्रशस्ती बहाल केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे श्री विजयादशमी व शस्त्रपुजनाचा उत्सवी कार्यक्रम रविवारी सायंकाळी यशवंत महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर घेण्यात आला. कार्यक्रमानिमित्त या परिसरास स्वातंत्र्यवीर सावरकर नगर असे नाव देण्यात आले होते. संघाचे सह सरकार्यवाह आलोककुमार हे प्रमुख वक्ते म्हणून तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

वरील कार्यक्रमास आपल्या प्रमुख राजकीय सहकार्‍यांसह उपस्थित राहिल्यानंतर खा.चव्हाण व त्यांच्या आमदार कन्येने आपली भावना फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त केली. त्यावर त्यांच्यावर कठोर टीकेचे ‘शब्दबाण’ सुटले. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी तर खा.चव्हाण यांचे २०१९ मधील संघावर निशाणा साधणारे लिखित मत समाजमाध्यमातून जारी केले.

अशोक चव्हाण २०१९मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात संघाशी संबंधित विषय समाविष्ट केल्याची बाब समोर आल्यानंतर खा.चव्हाण यांनी संघाला देशातील सगळ्यात मोठी विभाजनकारक शक्ती असे संबोधत या संघटनेचा इतिहास पूर्णपणे काळा असल्याचे नमूद केले होते. विद्यार्थ्यांना संघाची खरी माहिती द्यायची असेल, तर त्यांच्यावर तीनदा बंदी का घातली गेली, हेही अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी तेव्हा केली होती.

खा.चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशास आता पावणेतीन वर्षे लोटली आहेत. या कालावधीत त्यांनी या पक्षाच्या कार्यसंस्कृतीशी जुळवून घेतले तसेच स्थानिक पातळीवर संघाच्या पदाधिकार्‍यांशीही संवाद व सौहार्द राखला आहे. शारदा भवन शिक्षण संस्थेच्या प्रदीर्घ इतिहासात आजवर या संस्थेच्या परिसरात संघाचा कुठलाही कार्यक्रम होऊ देण्यात आला नाही. संघाच्या पदाधिकार्‍यांना नांदेडमध्ये आजवर अभिनव भारत शिक्षण संस्थेचे एनएसबी कॉलेज हे एकमेव हक्काचे ठिकाण होते; पण यंदा संघाला ‘शारदा भवन’च्या यशवंत महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर दिमाखदार कार्यक्रम संपन्न करता आला.

संस्थेचे अध्यक्ष या नात्याने खा.चव्हाण, चिटणीस द.पां.सावंत, आ.श्रीजया चव्हाण, आ.अमरनाथ राजूरकर इत्यादींनी कार्यक्रमाच्या आयोजनातही लक्ष घातले. कार्यक्रमाच्या निमित्ताने खा.चव्हाण यांनी संघाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना याच परिसरातील आयटीएमच्या सभागृहात सन्मानपूर्वक आमंत्रित केले होते. गणवेशातील संघ पदाधिकार्‍यांच्या स्वागतासाठी ‘रेड कार्पेट’ अंथरण्यात आले होते. मुख्य कार्यक्रमात चव्हाण व्यासपीठावर नव्हते, पण प्रमुख व्यक्तींसाठी केलेल्या आसन व्यवस्थेत पहिल्या रांगेत बसून त्यांनी आपला सहभाग नोंदविला. महापौर कविता मुळे, किशोर स्वामी, चैतन्यबापू देशमुख, एकनाथ पवार, अ‍ॅड.महेश कनकदंडे आदी सहकारी त्यांच्या आसपास बसलेले होते.

  • मागील काही वर्षांत खा.चव्हाण यांचा सोशल मीडिया चमू अत्यंत कार्यतत्पर झाला आहे. संघाचा वरील कार्यक्रम पार पडताच चव्हाण यांची भावना फेसबुकवर जारी झाली. त्यात त्यांनी संघावर स्तुतिसुमने उधळली नसली, तरी त्यांच्या कन्या श्रीजया यांनी या कार्यक्रमाचे वर्णन भारतीय संस्कृती, राष्ट्रभक्ती, शिस्त व सामाजिक एकतेची मूल्ये जपणारा उत्सव अशा शब्दांमध्ये केले. अन्य प्रमुख उपस्थितांच्या नावांचा उल्लेख त्यांनी केला. संघाचा हा उत्सव राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारा ठरला, असा अभिप्राय आ.श्रीजया चव्हाण यांनी वरील कार्यक्रमावर नोंदविला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT