वंदे भारतचा प्रवाशांना योग्य लाभ व्हावा यासाठी नांदेड येथून रेल्वे प्रस्थान वेळ पहाटे 5:00 ऐवजी 5:30 वाजता करावी आणि सुधारित वेळापत्रकानुसार मुंबईत दुपारी सुमारे 1:00 वाजेपर्यंत सुनिश्चित करावे, याशिवाय. उमरी रेल्वे स्थानकावर नरसापूरनगरसोलसह चार महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी गोपछडे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. pudhari photo
नांदेड

Ajit Gopchade : धर्माबाद रेल्वेस्थानकाला हेडगेवार यांचे नाव द्या !

रेल्वेमंत्र्यांकडे खा.डॉ.अजित गोपछडे यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड ः भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि डॉ.अजित गोपछडे या दोन राज्यसभा सदस्यांमध्ये रेल्वेमंत्र्यांना भेटून वेगवेगळ्या मागण्यांची निवेदने सादर करण्याची चढाओढ लागल्याचे मागील काही महिन्यांमध्ये दिसून आले आहे. खा.चव्हाण यांनी गेल्या आठवड्यात रेल्वेमंत्र्यांकडे नांदेड-बिदर रेल्वेमार्ग मार्गी लावण्यासंबंधी निवेदन दिल्यानंतर डॉ.गोपछडे यांनी नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद रेल्वे स्थानकाला डॉ.हेडगेवार यांचे नाव देण्याची मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे गुरुवारी केली.

नांदेडच्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक गेल्या मंगळवारी पार पडल्यानंतर राज्यसभेचे वरील दोन्ही सदस्य संसद अधिवेशनात सहभागी होण्यासाठी बुधवारी सकाळी दिल्लीला गेले. खा.अशोक चव्हाण यांनी बुधवारी राज्यसभेत काही विषय मांडल्यानंतर त्यांच्या प्रसिद्धी यंत्रणेने त्याचे वृत्त तात्काळ माध्यमांना पाठविले. दुसरीकडे खा.डॉ.गोपछडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे वेगवेगळ्या मागण्यांची जंत्री सादर करून आपल्या यंत्रणेमार्फत सविस्तर वृत्त पाठविले.

भाजपाचे दोन्ही राज्यसभा सदस्य आपल्या कृतिशीलतेचे दाखले दिल्लीमधून देत आहेत. खा.गोपछडे यांनी गुरुवारी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन मराठवाड्याच्या रेल्वेविषयक प्रश्नांकडे त्यांचे पुन्हा एकदा लक्ष वेधले. नांदेड-मुंबई वंदेभारत एक्सप्रेसचे सुधारित वेळापत्रक करण्याची मागणी मांडतानाच जिल्ह्यातील धर्माबाद रेल्वेस्थानकास डॉ.हेडगेवार यांचे नाव देण्याची मागणीही त्यांनी केली.

धर्माबाद रेल्वेस्थानकापासून जेमतेम 10-12 कि.मी. अंतरावर तेलंगण राज्यातील कंदकुर्ती हे हेडगेवार परिवाराचे मूळ गाव आहे. मागील अनेक वर्षांपासून तेथे हेडगेवार परिवारातील कोणाचेही वास्तव्य नसले, तरी या परिवाराची स्मृती तेथे जपली जाते. संघ परिवार आणि भाजपातील अनेकांसाठी कंदकुर्ती हे गाव श्रद्धास्थान बनलेले आहे.

डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष सध्या देशभर साजरे केले जात आहे. हा योग साधण्याचा प्रयत्न करत संघ कार्याची पार्श्वभूमी असलेल्या गोपछडे यांनी धर्माबाद रेल्वेस्थानकाच्या नामांतराचा विषय समोर आणला आहे.

नांदेड येथे 2008 साली झालेल्या गुरू-ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने गुरू गोबिंदसिंघांचे या नगरीतील वास्तव्य तसेच ऐतिहासिक गुरूद्वाराचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन नांदेड रेल्वेस्थानकाचा नामविस्तार करण्यात आला होता.

आता हे स्थानक ‌‘हजूर साहिब नांदेड‌’ या नावाने ओळखले जाते. त्यानंतर तब्बल 18 वर्षांनी जिल्ह्यातील एका रेल्वेस्थानकाचे नामांतर करण्याचा विषय भाजपाकडून समोर आणण्यात आला आहे. या मागणीवर रेल्वेमंत्र्यांनी नेमके काय सांगितले, हे मात्र गोपछडे यांच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेले नाही. या मागणीवर भाजपाचे दुसरे खासदार अशोक चव्हाण यांची काय भूमिका आहे, ते समोर आले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT