Angry farmer broke Tehsildar's car
मुदखेड, पुढारी वृत्तसेवा : ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. राज्य सरकारने नुकसानीचे . पंचनामे करीत दिवाळीपू र्वीच अनुदानाची घोषणा केली होती. परंतु अनेक शेतकऱ्यांना दिवाळी झाली तरी अजूनपर्यंत शासनाकडून अनुदान मिळालेलेच नाही. अनुदान न मिळाल्याने शेतकरी आत्महत्या करतोय, हे अधिकारी मलिदा खात आहेत, असा आरोप करीत एका शेतकऱ्याने थेट तहसीलदारांचे चारचाकी 1 वाहनच फावड्याने फोडले.
या घटनेमुळे 7 जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पैसे दिवाळीपूर्वी खात्यावर जमा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. परंतु दिवाळीनंतरही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या वासरी, ता. मुदखेड येथील शेतकरी साईनाथ मारुती खानसोळे याने सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात उभी केलेली तहसीलदारांची चारचाकी फावड्याने जय जवान जय किसानचा नारा देत फोडली.
मराठवाड्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असून, सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग यासोबतच भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद यां पिकांनाही मोठा फटका बसला आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांची जनावरेही मृत्युमुखी पडली होती. अनेकांच्या शेतातील माती खरवडून गेली होती.
अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांना बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकतीच ३१ हजार कोटींच्या नुकसान भरपाईची घोषणा केली होती. परंतु दिवाळी होऊनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम आलीच नाही. वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने आता शेतकऱ्यांचा संयम सुटत आहे. त्यामुळे शेतकऱ्याने संतप्त होत थेट तहसीलदारांची स्कॉर्पीयो गाडीच फावड्याने फोडत संताप व्यक्त केला. एकीकडे शेतकरी आत्महत्या करतोय, तर अधिकारी मलिदा खात आहेत, असा आरोप या शेतकऱ्याने केला आहे. दरम्यान या प्रकरणी मुदखेड पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे.
दिवाळीपूर्वी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आलेली असून सुमारे ३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रकिया सुरू आहे. दरम्यान, महसूल कर्मचाऱ्यांनी या शेतकऱ्यांस ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले असून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.-मारुती जगताप, नायब तहसीलदार
उद्या आमदाराची गाडी फोडतो... हे सरकार व्यापाऱ्यांचे सरकार आहे, फाशी झाली तरी चालेल पण शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेत की नाही, हे तहसीलदारांचे काम होते, त्यांनी शेतकऱ्यांना विचारायला पाहिजे होते. सर्वसामान्य शेतकरी जेव्हा टॅक्स भरतो तेव्हा तुमच्या अधिकारी लोकांच्या पगारी होतात. तुम्हाला या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे. आज तहसीलदाराची गाडी फोडली उद्या आमदाराची गाडी फोडतो. काय व्हायचे ते होऊ द्या...साईनाथ मारुती खानसोळे, शेतकरी