सामान्य शेतकऱ्याची न्यायासाठी विभागीय सहनिबंधकांकडे धाव ! file photo
नांदेड

Nanded News : सामान्य शेतकऱ्याची न्यायासाठी विभागीय सहनिबंधकांकडे धाव !

अनुभव प्रमाणपत्रावरून उमेदवारी अर्ज बाद; निर्णयाविरोधात अपील दाखल

पुढारी वृत्तसेवा

An ordinary farmer rushes to the Divisional Joint Registrar seeking justice!

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत मुदखेड पतसंस्था मतदारसंघातील उमेदवार तथा डोंगरगाव सेवा सहकारी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मारोतराव जयवंतराव पाटील (व्यवहारे) यांचा उमेदवारी अर्ज सहकार क्षेत्रातील आवश्यक पाच वर्षांचा अनुभव नसल्याच्या कारणावरून अवैध ठरविण्यात आला आहे. सुमारे १५ वर्षे सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्य केलेल्या एका सामान्य शेतकऱ्याचा अर्ज अनुभव प्रमाणपत्राच्या कारणावरून बाद झाल्याने त्यांनी या निर्णयाविरोधात लातूर येथील विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले आहे.

नांदेड जिल्हा बँक निवडणुकीच्या अर्ज छाननीत व्यवहारे यांचा अर्ज अनुभवाच्या तांत्रिक मुद्यावरून बाद केल्याने या प्रकरणाची जिल्हाभर चर्चा सुरू झाली आहे. मारोतराव पाटील व्यवहारे यांनी यापूर्वी बँकेचे माजी संचालक गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्या उमेदवारीवर बँकिंग सुधारणा कायद्यातील तरतुदींचा आधार घेत हरकत नोंदवली होती. त्या हरकतीनंतर शिंदे यांचा अर्ज बाद झाला. त्यानंतर आता स्वतः व्यवहारे यांचाच अर्ज अनुभव प्रमाणपत्राच्या कारणावरून बाद झाल्याने जिल्हा बँक निवडणुकीला नवे वळण मिळाले आहे.

स्वतःचा अर्ज बाद झाल्यामुळे निवडणूक प्रक्रियेबाबत व्यवहारे यांनी प्रश्न उपस्थित केले असून, सहकार क्षेत्रात त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. व्यवहारे हे सन २००३ ते २०१५ या कालावधीत डोंगरगाव सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष होते. त्यानंतर सन २०२२ पासून आजतागायत ते पुन्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी संस्थेच्या सचिवांनी दिलेले अनुभव प्रमाणपत्र जोडले होते. त्या प्रमाणपत्रात आवश्यक पाच वर्षांचा अनुभव स्पष्ट नमूद असतानाही इसवीसनाच्या नोंदीतील तांत्रिक बाबीचा आधार घेत प्रमाणपत्र ग्राह्य धरले गेले नाही आणि अर्ज बाद करण्यात आला.

त्यानंतर डोंगरगाव संस्थेच्या सचिवांनी अनुभव प्रमाणपत्र दुरुस्ती करून दिले आहे. अर्ज बाद करण्याचा निर्णय नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांना छेद देणारा असल्याचा दावा करीत व्यवहारे यांनी या निर्णयाविरूध्द लातूर येथे धाव घेत विभागीय सहनिबंधकाकडे अपिल दाखल केले आहे.

मी सन २००३ पासून डोंगरगाव सेवा सहकारी संस्थेचा संचालक आणि अध्यक्ष म्हणून आजपर्यंत कार्यरत आहे. मला सहकार क्षेत्रातील १५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. माझ्यावर राजकीय कुरघोडीतून अन्याय झाला असावा, असे वाटते. मला माझे मत आणि बाजू मांडण्याची संधीही मिळाली नाही. माझा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याचा निर्णय बेकायदेशीर असून त्याविरोधात विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले आहे.
- मारोतराव पाटील व्यवहारे, अध्यक्ष, डोंगरगाव सेवा सहकारी संस्था, मुदखेड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT