indira gandhi death anniversary : इंदिरा गांधींसाठी विमानतळ उभारले.. पण त्या कधी येऊ शकल्याच नाहीत... File Photo
नांदेड

indira gandhi death anniversary : इंदिरा गांधींसाठी विमानतळ उभारले.. पण त्या कधी येऊ शकल्याच नाहीत...

दुर्गम डोंगररांगांमध्ये हरवलेल्या नांदेड जिल्ह्यातील किनवटच्या आकाशात एके काळी ‌‘विमान‌’ उतरले होते, ही गोष्ट आज ऐकली की लोक आश्चर्यचकित होतात.

पुढारी वृत्तसेवा

An airport was built for Indira Gandhi.. but she could never come...

किनवट (जि. नांदेड) : अरूण तम्मडवार

दुर्गम डोंगररांगांमध्ये हरवलेल्या नांदेड जिल्ह्यातील किनवटच्या आकाशात एके काळी ‌‘विमान‌’ उतरले होते, ही गोष्ट आज ऐकली की लोक आश्चर्यचकित होतात. पण ती फक्त गोष्ट नव्हेतर एका दूरदर्शी नेत्याच्या जिद्दीचे आणि आदिवासी भागाच्या विकासाची आस बाळगणाऱ्या समाजाच्या सामूहिक स्वप्नाचे प्रतीक होती. राजगडच्या डोंगरपायथ्याशी वसलेले ‌‘प्रियदर्शनी विमानतळ‌’ हे त्याच स्वप्नाचे साक्षीदार ठरले.

किनवट तालुक्याच्या विकासासाठी आयुष्य झटवणारे माजी आमदार व खासदार उत्तमराव राठोड हे या विमानतळ निर्मितीचे शिल्पकार होते. 1957 ते 1972 दरम्यान चार वेळा आमदार आणि नंतर तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या या नेत्याने किनवटच्या विकासासाठी सुरूवातीपासून पायाभूत सुविधा उभ्या करण्यावर भर दिला. वीज, रस्ते, सिंचन तलाव, रेल्वे, बससेवा अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या प्रभावाचा वापर करून तालुक्याला जोडण्याचा प्रयत्न केला. त्याच काळात त्यांनी एक धाडसी स्वप्न पाहिले किनवटसारख्या आदिवासी भागात विमानतळ उभारण्याचे.

या स्वप्नामागे एक रंजक पार्श्वभूमी होती. 1960 मध्ये दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात किनवट तालुक्यातील जवरला आणि बुधवारपेठ या गावांतील आदिवासी कलाकारांनी सादर केलेल्या ‌‘ढेमसा‌’ व ‌‘दंडार‌’ नृत्याने तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांच्यासह इंदिरा गांधी यांनाही मोहित केले होते. त्या प्रसंगाचे एक छायाचित्र पुढे, इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या पाहण्यात आले अन्‌‍ गतस्मृती जाग्या होऊन त्यांनी या पारंपरिक नृत्याचे सादरीकरण प्रत्यक्ष किनवटच्या भूमीवर पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

ही संधी साधत आ. उत्तमराव राठोड यांनी अक्षरशः रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या श्रमदानातून 1972 मध्ये डोंगरावर वसलेल्या राजगड येथील एका विस्तीर्ण मैदानामध्ये एक ‌‘हेलिपॅड‌’ तयार करून घेतले. पुढे तेच ‌‘प्रियदर्शनी विमानतळ‌’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्या काळी 20 रुपयांच्या तिकिटावर उड्डाणाचे प्रात्यक्षिक झाले, ज्यामुळे स्थानिक जनतेत प्रचंड उत्साह होता. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते या धावपट्टीचे उद्घाटनही झाले. किनवटच्या इतिहासात हा प्रसंग एक नवा अध्याय होता कारण दुर्गम डोंगराळ भागात विमान उतरल्याची ही पहिली वेळ होती.

मात्र नशिबाला काही वेगळंच मंजूर होतं. इंदिरा गांधींचा नियोजित दौरा काही कारणास्तव रद्द झाला आणि या धावपट्टीची कथा शासनाच्या फाईलपुरती मर्यादित राहिली. पुढील अनेक दशके या ठिकाणी कोणीही राजकीय वा प्रशासकीय पुढाकार घेतला नाही. निसर्गाने हळूहळू त्या धावपट्टीला कुरणात रूपांतरित केले, आणि ‌‘प्रियदर्शनी विमानतळ‌’ लोकांच्या स्मृतीतून विरत गेले.

विस्ताराचा निर्णय कागदोपत्री

काही वर्षांपूर्वी, जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी किनवट भेटीदरम्यान पुन्हा या विमानतळाच्या पुनरुज्जीवनाचा विषय उपस्थित केला. आपत्कालीन परिस्थितीत संपर्कासाठी ही धावपट्टी उपयोगी ठरेल, असे सांगून त्यांनी काम पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. त्यानंतर पुढे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांनी देखील राजगड येथे भेट देऊन या विमानतळाचे रूपांतर पुन्हा कार्यान्वित करण्याची आणि वैमानिक व हवाई सुंदरींसाठी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याची कल्पना पुढे मांडली. आदिवासी भागातील युवक-युवतींसाठी रोजगाराची नवी दालने उघडावीत, असा त्यांचा हेतू होता.

तथापि, त्या घोषणांच्या गजरानंतरही ‌‘प्रियदर्शनी विमानतळ‌’ आजही शांत आहे. धावपट्टीवर गवत उगवले आहे, आणि हवेत केवळ आठवणींची धूळ उडते. हे विमानतळ आज किनवटच्या विस्मृतीत गेलेल्या इतिहासाचा भाग असले, तरी त्यामागे दडलेले प्रयत्न, आशा आणि श्रमदानाचा सुवास अजूनही त्या भूमीत दरवळत आहे. राजगडच्या आकाशात पुन्हा विमान झेपावेल का, हा प्रश्न आजही तसाच अनुत्तरित आहे. पण या भूमीने कधीकाळी आपल्या हातांनी ‌‘विमानतळ‌’ घडवला होता, ही गोष्ट किनवटच्या जनतेच्या आत्मगौरवाची कथा बनून कायम स्मरणात राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT