Accused of robbing a citizen arrested within 24 hours
नांदेड, पुढारी वृत्तसेवा खासगी कामानिमित्त घराबाहेर निघालेल्या व पावडेवाडी ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या माणिक संभाजी पावडे या ४७वर्षीय इसमाला खंजरचा धाक दाखवून लुटणा-या सात जणांना भाग्यनगर पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली. आरोपीमध्ये विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे.
माधव पावडे हे रविवारी सायंकाळच्या सुमारास खासगी काम आटोपून घराकडे परतत होते. मोर चौकाजवळ अज्ञात आरोपींनी त्यांना खंजरचा धाक दाखवून त्यांच्याजवळील सहा हजार ७०० रोख रकम जबरीने लंपास केली. या प्रकारानंतर त्यांनी भाग्यनगर पोलीस ठाणे गाठले.
तेथे रितसर तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी तपासासंबंधी योग्य त्या सूचना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष तांबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश नाईक, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरविली. काही ठिकाणीचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
या प्रकरणात कृष्णा उत्तम सोनटक्के (वय १८), रोहन बाबुराव टोम्पे (वय १८) दोघे रा. जंगमवाडी व प्रेम चंद्रकांत घोसले (वय २२) रा. कल्याणनगर यांच्यासह चार विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून सहा हजार २०० रुपये रोख दोन मोटर सायकल, आठ मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली शस्त्र जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत प्रदीप गर्दनमारे, गजानन कीडे, दत्ताराम कदम, विष्णू मुंडे, राहुल लाठकर, नागनाथ चापके, महिला चालक बाबर यांनी मोलाची कामगिरी बजावली. भाग्यनगर पोलिसांच्या या कारवाईचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतूक केले आहे.