A porcupine was found in the Vimana Building area of Kautha
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जंगली पशू असलेले साळिंदर कौठा भागात गुरुवारी (दि. एक) सकाळी आढळले. त्याची माहिती वन विभागाला दिल्यानंतर त्या पथकाने साळिंदराला शिताफीने पिंजऱ्यात पकडून सुरक्षित अधिवासात सोडले.
गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर पूर्वी बऱ्यापैकी वेगवेगळ्या झाडांचे बन होते. कौठा भागात मोंढा ते सिडको मार्गावर सुद्धा बाभूळ बन होते. याठिकाणी काही जंगली पशू पूर्वी वास्तव करून होते, असे लोक सांगत. नांदेड शहराच्या काही भागात आजही मानवी वस्तीला लागून मोठ्या प्रमाणात मोर आढळतात. साप, नाग असे प्राणीही नेहमी आढळल्याचे दिसून येते. नवीन नांदेड भागात यापूर्वीस-द्धा साळिंदर सापडल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले.
साळिंदर हा जंगली प्राणी असून, तीन फुटापर्यंत त्याची वाढ असते. अंगावर टोकदार व राठ असे केस असतात. त्या आधारेच तो संकटकाळी आपला बचाव करतो. आपल्या भागातील साळिंदर हा जमिन उकरून बिळात राहतो. हाच प्राणी पूर्णपणे शाकाहारी असून, सर्वप्रकारच्या भाज्या, धान्य, फळे तसे झाडांची मुळे हे त्याचे अन्न आहे. साळिंदरामुळे बागायती शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
कौठा परिसरात मुख्य रस्त्यावर असलेल्या गुरुद्वाराच्या लगत नव्याने झालेल्या ड्रेनेज पाईपलाईनच्या एका चेंबरमध्ये या साळिंदराने आश्रय घेतला होता. येथील एका रहिवाशाने पाहिल्यानंतर हळुहळू बघ्यांची गर्दी झाली. व्यापारी गौरीशंकर शर्मा यांनी प्रसंगावधान राखत वनविभागाच्या अविनाश वागदकर यांना संपर्क साधून माहिती दिली. ते लगेचच सहकाऱ्यांसह पिंजरा घेऊन घटनास्थळी पोहोचले. मोठ्या शिताफीने साळिंदराला चेंबरमधून बाहेर काढून पिंजऱ्यात कोंडले व त्याच्या सुरक्षित अधिवासात सोडले.
वन्य जीवांच्या संवर्धनास सहकार्य करावे - वाबळे साळिंदर हा प्राणी मुळात शांत स्वभावाचा असून शाकाहारी असल्याने तो अनेकवेळा मनवी वसाहतीच्या शेजारी आढळतो. गुरुवारी जागरुक नागरिकांनी माहिती दिल्यामुळे त्याला शिताफीने पकडून सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले. अशाप्रकारे वन्यजिवांच्या संवर्धनासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.- केशव वाबळे, उपवनसंरक्षक नांदेड