Nanded News : दुष्काळाने आधीच कंबरडे मोडले, आता कापूस चोरणाऱ्या टोळीचे नवे संकट ! कापूस वेचून नेणारी टोळी सक्रिय file photo
नांदेड

Nanded News : दुष्काळाने आधीच कंबरडे मोडले, आता कापूस चोरणाऱ्या टोळीचे नवे संकट ! कापूस वेचून नेणारी टोळी सक्रिय

हदगाव तालुक्यातील कृष्णापूर परिसरात शेतातील कापूस वेचून नेणारी टोळी कार्यरत असल्याची चर्चा असून, यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

A new crisis has emerged for farmers in the form of a gang that steals cotton

तामसा, पुढारी वृत्तसेवा : आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहायची, कर्ज काढून शेती करायची, रात्रंदिवस शेतात राबायचे आणि हातात आलेले पीक पाहून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची स्वप्ने रंगवायची... मात्र निसर्गाच्या अवकृपेने आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या पदरी आता आणखी एक संकट पडले आहे. हदगाव तालुक्यातील कृष्णापूर परिसरात शेतातील कापूस वेचून नेणारी टोळी कार्यरत असल्याची चर्चा असून, यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांच्या घामावर चोरट्यांचा डल्ला !

एकीकडे दुष्काळी परिस्थिती, दुसरीकडे पिकांचा घटलेला उतारा, वाढता उत्पादन खर्च, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता... अशा अनेक संकटांशी शेतकरी आधीच झुंज देत आहे. त्यात आता शेतातील कापूसच सुरक्षित नसेल, तर शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे ? असा हृदय पिळवटून टाकणारा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकरी आपल्या लेकरांप्रमाणे पिकांची काळजी घेतो. उन्हातान्हात राबतो, घाम गाळतो आणि कापसाच्या बोंडातून मिळणाऱ्या उत्पन्नावर वर्षभराच्या संसाराचा गाडा चालवण्याची आशा बाळगतो. मात्र, अशा प्रकारे कापूस वेचून नेण्याचे प्रकार घडत असतील, तर शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि जगण्याच्या आशेलाच तडा जात आहे.

शेतकऱ्यांनी करावे तरी काय ? जगावे की मरावे ?

शेतात पीक उभे असताना निसर्गाची भीती, पीक हातात आल्यावर चोरट्यांची भीती आणि घरी गेल्यावर कर्जफेडीची चिंता... शेतकऱ्यांच्या वाट्याला नेमके सुख तरी कधी येणार? शेतकऱ्यांच्या या वेदना समजून घेणार कोण? प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन कृष्णापूर परिसरातील कापूस चोरीच्या घटनांची चौकशी करावी. संबंधित टोळीचा शोध घेऊन शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे. रात्रीची गस्त वाढवून शेतमालाच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT