किनाळा : मनोहर मोरे
नरसी येथे सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत अश्लील व्हिडीओ दाखवून लैंगिक छळ केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी साईनाथ हणूमंत जारीकोटे यांच्याविरुद्ध फिर्यादीवरून रामतीर्थ पोलिसात पोस्को ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जारीकोटे हा पीडितेला धमकी देवून घरी बोलावत असे. यावेळी तिला अश्लील व्हिडिओ दाखवून जबरदस्ती तिला विवस्त्र करायचा. तसेच या गोष्टीला विरोध केला तर तिला मारुन टाकण्याची धमकी देत होता. जारीकोटे यांने वर्षभर त्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केला. वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून सोमवारी (दि.9) अल्पवयीन मुलीने रामतीर्थ पोलीस ठाण्यात आरोपी साईनाथ जारीकोटे याच्या विरुद्ध फिर्याद नोंदवली.
त्यावरून रामतीर्थ पोलिसांनी संशयित आरोपी साईनाथ जारीकोटे (रा.नरसी) याच्यावर पोस्को ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. यानुसार त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप हे करीत आहेत.