Nanded District Bank : जिल्हा बँकेच्या १२ जागांसाठी ९५.५४ टक्के मतदान file photo
नांदेड

Nanded District Bank : जिल्हा बँकेच्या १२ जागांसाठी ९५.५४ टक्के मतदान

२६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

पुढारी वृत्तसेवा

95.54% voter turnout for 12 District Bank seats

नांदेड, पुढारी वृत्तसेवा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या उर्वरित १२ जागांसाठी रविवारी शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले. एकूण १३४४ मतदारांपैकी सायंकाळी पाच वाजेपर्यंत १२८४ (९५.५४ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. खासदार अशोक चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार अमरनाथ राजूरकर, खासदार रवींद्र चव्हाण, मीनल पाटील खतगावकर, आमदार राजेश पवार, मारोतराव कवळे यांनी आपापल्या मतदान केंद्रावर मतदान केले. मंगळवारी नांदेड येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

तालुकास्तरीय अ गटातील ९ आणि आरक्षित ३ जागांसाठी १६ मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. बँकेच्या एकुण २३ जागांपैकी ११ जागा याआधीच बिनविरोध निघाल्या आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दीडशे कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतील. रविवारी सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत ८७ टक्के, तर सायंकाळी साडेचार वाजता वाजेपर्यंत २४.१४ टक्के मतदान झाले होते. किनवट, माहूरसह अन्य काही ठिकाणी दुपारपर्यंतच शंभर टक्के मतदान झाले होते.

नांदेड शहरातील लेबर कॅलनी येथील कामगार कल्याण मंडळ, अर्जापूर येथील जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा, मुदखेड येथे जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा मोंढा, कंधार येथे जि.प. हायस्कूल (मुलांचे), महाराणा प्रताप चौक, लोहा येथे जि.प.प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लोहा, मुदखेड येथे जि.प. हायस्कूल (मुलींचे), देगलूर येथे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय, नायगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती इमारत, बिलोली येथील लिटल फ्लॅवर इंग्लिश मीडियम स्कूल, धर्माबाद येथे उपविभागीय कार्यालय सा.बां. विभाग, भोकर येथे जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, उमरी येथे जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, हदगाव येथे जि.प. हायस्कूल पोलीस स्टेशन मागे, हिमायतनगर येथे जि.प. हायस्कूल बोरगडी रोड, किनवट स्मार्ट क्लासरूम जि.प.शाळा रेल्वेस्टेशन रोड, माहूर येथे जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर आदी १६ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते.

१२ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात असून नांदेड, माहूर, मुदखेड, अर्धापूर, भोकर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर आणि देगलूर येथे तालुक्यासाठी आणि ओबीसी, भटक्या विमुक्त, अनु. जाती-अनु.सूचित जमाती या प्रवर्गातील जिल्हास्तरीय ३ जागांसाठी उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. मतदान शांततेत पार पडावे यासाठी सर्व मतदार संघातील मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नागेलीकरांकडून उमेदवारी न मिळाल्याची खंत व्यक्त

गेली दहा वर्षे जिल्हा बँकेचे संचालक राहिलेले गोविंद शिंदे नागेलीकर यांना मुदखेड कृषी पतसंस्था मतदारसंघातून खासदार अशोक चव्हाण यांनी उमेदवारी नाकारली. बँकिंग कायद्यातील सुधारणेमुळे त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केला होता. अपिलात अर्ज वैध ठरला; मात्र भाजपच्या तरुण वर्गाचा विरोध झाल्याने नागेलीकर यांच्या ऐवजी मारुती जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी हुकल्याची खंत नागेलीकर यांनी मतदानापूर्वी मुदखेड येथे काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते संदीपकुमार देशमुख यांच्याकडे व्यक्त केली. विशेष म्हणजे काँग्रेस गटाने त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे नेते या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले. परंतु भाजप नेत्यांच्या प्रभाव क्षेत्रातील काही जागा बिनविरोध आल्या नाहीत. या जागा निवडून याव्यात यासाठी भाजप नेत्यांनी मागील दोन दिवसात अनेक बैठका घेतल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT