93.27 percent stock in Vishnupuri project; Inflows continue
नांदेड : पुढारी वृत्तसेवा दीड महिनाराम प्रतीक्षेनंतर आबादानी झाले असून १९ जून रोजी लागलेल्या पुष्य नक्षत्रात चिंता मिटली. गेल्या तीन दिवसांत चोहीकडे पाणीचपाणी झाले आहे. जलाशयांतील साठा झपाट्याने वाढत चालला आहे. विष्णुपुरी प्रकल्पात ९३.२७टक्के साठा झाला आहे. पूर्णेचा विसर्ग बंद झाला असला, तरी अन्य ठिकाणांहून आवक सुरुच असेल, तर रात्री विष्णुपुरी प्रकल्पाचा एखादा दरवाजा उघडण्याची वेळ येऊ शकते, अशी माहिती उपअभियंता अरुण अंकुलवार यांनी दिली.
मागील तीन दिवसांपासून सूर्यदर्शन नाही. दररोज जिल्ह्यात सर्वदूर पाऊस आहे. गुरुवारी सकाळी २०.४० मि.मी. पावसाची नोंद झाली. हिमायतनगर, जवळगाव, सरसम (ता. हिमायतनगर) व वाई (ता. माहूर) या चार मंडळांत अतिवृष्टी झाली. शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा कमी होता. तरीही सर्वदूर १०.६० मि.मी. पाऊस झाला. तर शनिवारी (दि. २६) सकाळी ८ वाजता नोंदला गेलेला पाऊस २५.७० मि.मी. एवढा झाला. यावर्षी मुखेड (१९०.६०) आणि देगलूर (१९६.१०) या दोनच तालुक्यात २०० मिमी. पेक्षा कमी पाऊस झाला आहे. किनवट तालुक्यात सर्वाधिक ४९७ मि.मी. पाऊस झाला.
दरम्यान, सर्वात कमी केवळ ४६.२ मिमी पाऊस करखेली (ता. धर्माबाद) मंडळात झाला आहे. तर सर्वाधिक १३८ मिमी. पाऊस शिवणी (ता. किनवट) मंडळामध्ये नोंदला गेला. यंदाच्या पावसाळ्यात आजवर ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस ३० मंडळांमध्ये नोंदला गेला. तर १६ मंडळांमध्ये १०० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस नोंदला गेला. मे महिन्यात एकदा अतिवृष्टी झाली होती. तर जूनपासून आजवर तीनवेळा अतिवृष्टी झाली आहे. दि. २४ जून रोजी हिमायतनगर तालुक्यातील हिमायतगर, जवळगाव व सरसम या मंडळात प्रत्येकी १०१ मिमी तर वाई (ता. माहूर) येथे ८८.२५ मिमी पाऊस झाला होता. याच चार मंडळात २४ जुलैला सुद्धा अतिवृष्टी झाली. पहिल्या ३ मंडळात ६७.५० मिमी तर वाईमध्ये ८२.५० मिमी. पाऊस झाला.
पुष्य नक्षत्रात सारे चित्र पालटून गेले असून शेतीला पाणी मुबलक झाले आहे. जलाशयातील साठे झपाट्याने वाढत चालले आहेत. आणखी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तरी मागील वर्षर्षीपेक्षा पावसाचा अनुशेष आणखी ३० टक्क्यांनी कमी आहे. विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरील भागातून पाणी येत आहे. कालपासून पुर्णेतून येणारी आवक थांबली आहे. परंतु गोदावरीत त्र्यंबकेश्वर, भंडारदरा, खडकपूर्णा, येलदरी, सिद्धेश्वर येथूनही पाणी येते. या सर्व ठिकाणाहून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण पाहून रात्री उशिरा किमान एक तरी गेट उघडले जाईल, असा अंदाज व्यक्त होतो आहे.
विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरील बाजूस असलेले अंतेश्वर व दिग्रस हे दोन मध्यम प्रकल्प बंधारे भरुन घेण्याचा पाटबंधारे विभागाचा मानस दिसून येतो. दरम्यान, विष्णुपुरी प्रकल्पाच्या खालच्या भागातील आमदरा व बाभळीचे दरवाजे उघडेच ठेवण्यात आले आहेत.
रात्रीपर्यंत विष्णुपुरीमध्ये पाण्याची आवक वाढल्यास किमान एकतरी दरवाजा उघडावा लागेल, अशी शक्यता उपअभियंता अरुण अंकुलवार यांनी स्पष्ट केली.
यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दोन दिवसांपूर्वीपासून दिला जातो आहे. विष्णुपुरीचे पाणी सुटल्यास पात्र व काठावरील घाण वाहून जाण्यास मदत होणार आहे. जलपर्णी सुद्धा वाहून जाईल.