50 grams of gold biscuits stolen from a bag
नांदेड, पुढारी वृत्तसेवा जुना मोढा ते सिडको प्रवास करत असताना एका व्यक्तीच्या बॅगेमधील ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट चोरीला गेले आहे. याप्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. नांदेड महापालिकेत कार्यरत असलेले - कर्मचारी जळबा केरबा काळेवाड हे १० सप्टेंबर रोजी जुना मोंढा परिसरातून ऑटो रिक्षाने सिडकोला निघाले, तेथे पोहचल्यानंतर त्यांना बॅगेतील १० लाख रुपये किमतीचे सोन्याचे बिस्कीट गहाळ झाल्याचे लक्षात आले.
त्यांनी तत्काळ इतवारा, ग्रामीण पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. शेवटी या प्रकरणी शुक्रवारी इतवारा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि रमेश गायकवाड हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कुष्णुरच्या औद्योगिक वसाहतीतील टाटा केमिकल्स कंपनीमधून अज्ञात चोरट्यांनी ३५० किलोग्राम वजनाचे ऑईल व अन्य साहित्य असा १ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. दोन दिवसांपूर्वी घडलेली ही घटना आज उघडकीस आल्यानंतर कुंटूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोउपनि जाधव करत आहेत.