वसंत कारखाना  
मराठवाडा

नांदेड : ‘वसंत’ १५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देणार, उच्च न्यायालयात तोडगा

स्वालिया न. शिकलगार

उमरखेड (जि. नांदेड) : पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या ५ वर्षांपासून बंद असलेला तालुक्यातील वसंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात अखेर उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठात तोडगा निघाला आहे. ऊस उत्पादक सभासद, कामगार, राजकीय नेते, लोकप्रतिनिधी तसेच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून कारखाना सुरू करण्यासंदर्भात न्यायालयात तडजोड झालीय. कांरखाना आगामी काळात १५ वर्षांच्या दीर्घ मुदतीसाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे.

परिणामी, कारखान्याच्या ऊस उत्पादकांना ज्या घटकेची आतुरतेने वाट बघत होती. तो क्षण लवकरच पहावयास मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. लवकरच कारखाना भाडेतत्वावर देण्याबाबत टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती अवसायक योगेश गोतरकर यांनी दिली.

पोफाळी (ता. उमरखेड) येथील वसंत सहकारी साखर कारखाना गेल्या ५ वर्षांपासून बंद आहे. कारखान्यावर जिल्हा बँकेचे कर्ज असल्यामुळे बँकेने कारखान्यावर जप्ती आणली होती. दुसरीकडे सरकारने या कारखान्यावर अवसायक नेमला होता. अशा परिस्थितीत कारखाना सुरू करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू ठेवले होते. दुसरीकडे, कामगारांची कोट्यावधी रुपयांची देणे, शेतकऱ्यांची देणे, शासनाचे देणे, प्रॉ प्रॉव्हिडंट फंड अशा विविध थकीत देण्याच्या वसुली संदर्भात कारखान्याच्या विरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती.

एकतर कारखाना दीर्घ मुदतीसाठी भाड्याने द्यावा किंवा विक्री करावा, असे दोन पर्याय शासनापुढे होते, परंतु विक्रीला शासनाने विरोध दर्शविला. त्यामुळे पुसद, उमरखेड, महागाव, हदगाव आणि हिमायतनगर येथील शेतकरी व कामगार अडचणीत आले. अखेर गेल्या वर्षाभरापासून पुन्हा कारखाना सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. १४ जानेवारीला कारखाना साईटवर बँकेचे अध्यक्ष, संचालक, ऊस उत्पादक, कामगार, आजी – माजी आमदार, विविध संस्थांचे आजी व पाचही तालुक्यांना दिलासा मिळाला. कारखाना सुरू करण्यासाठी तत्कालीन सहकारमंत्री, पालकमंत्री, परिसरातील लोकप्रतिनिधी यांनीही हालचाली सुरू केल्या.

वसंत सुरू झाल्यास या भागातील थांबलेले आर्थिक चक्र पुन्हा सुरू होईल. ऊस उत्पादक, कामगार, तोडणी ठेकेदार, व्यापारी वाहतूक ठेकेदार यांसह पाचही तालुक्यातील आर्थिक व्यवहारात सुरळीत होतील. हा कारखाना भाडेतत्त्वावर सुरू करून ऊस उत्पादक, कामगार यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न शासन करणार आहे, असे योगेश गोतरकर यांनी अवसायक वसंत सहकारी साखर कारखाना १४ जानेवारीच्या बैठकीचा अहवाल संचालक मंडळासमोर मांडला होता.

ऊस उत्पादक, कामगारांसह सर्वांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात बँकेने विचार केला  . बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी १ फेब्रुवारीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यात टिकाराम कोंगरे, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक माजी पदाधिकारी यांची बैठक झाली. त्यात बँकेने कारखाना भाडेतत्त्वावर देणे किंवा विक्री करणे, असे पर्याय दिले होते . मात्र, सर्वांनी कारखाना विक्रीला विरोध दर्शविला. तत्पुर्वी जिल्हा बँकेने संचालक प्रा. शिवाजी राठोड यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण केली होती.

या समितीचे सदस्य अनुकूल चव्हाण, स्मिता कदम हे बैठकीला उपस्थित होते. वसंत कारखाना सुरू होण्यासाठी उमरखेड तालुक्यातील आमदार नामदेव ससाने, माजी आमदार विजय खडसे, 'वसंत'चे माजी अध्यक्ष तातू देशमुख, विलास चव्हाण यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी ही महत्त्वाची भूमिका बजावली अखेर आज न्यायालयाने १५ वर्षांसाठी वसंत कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास निर्णय दिला. यामुळे परिसरातील सर्व ऊस उत्पादक, शेतकरी कामगार संघटना यांच्या सर्वांमध्ये वसंत सुरू होण्याच्या अशा पल्लावित झाल्या आहेत.

वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर या संबंधाने उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे न्यायलयीन प्रक्रिया सुरु होती. त्यामध्ये आज वसंत कारखाना १५ वर्षांकरीता भाडेतत्वावर देण्याबाबतचा निकाल देण्यात आला आहे. लवकर टेंडर प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे. – योगेश गोतरकर, अवसायक वसंत कारखाना

उमरखेड तालुक्यातील सर्व आजी-माजी आमदारांनी तसेच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ऊस उत्पादक कामगार सामाजिक संस्था आणि विशेषतः पत्रकार मंडळींनी सर्वांनी सहकार्य केले. त्यामुळे वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भातला निर्णय झालेला आहे. गेल्या पाच वर्षापासून बंद असलेला कारखाना लवकरच सुरू होईल. – डॉ गणेश घोडेकर, अध्यक्ष ऊस उत्पादक संघ वसंत सहकारी साखर कारखाना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT