आष्टी; पुढारी वृत्तसेवा : आई वडील शेतात कामासाठी गेल्याची संधी साधून शेजारी राहत असलेल्या १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला स्वतच्या घरात बोलावून अत्याचार केल्याची घटना घडली. पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी (दि. ३) संशयित आरोपीवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टीमध्ये मोलमजुरी करून उपजिवीका भागविणारे कुटुंब राहत आहे. या कुटुंबातील पिडीत मुलगी सातवीच्या वर्गात शिकत होती. आई वडील शेतात गेल्याचे पाहून मुलगी घरी एकटी असताना आरोपीने पीडित मुलीला घरी बोलावून अत्याचार केल्याची फिर्याद देण्यात आली आहे. दि. ५ जून रोजी व पुन्हा दि. १ जुलै रोजी पीडित मुलीवर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत कोणाला काही सांगितल्यास कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी आरोपीने मुलीला दिली होती. गेल्या काही दिवसापासून मुलगी शाळेत जात नसल्याने तिच्या आईने विश्वासात घेऊन विचारपुस केली असता मुलीने तिच्या आईला सोमवारी (दि. ३) हा प्रसंग सांगितला. मुलीच्या आईने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्याने आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांनी भेट दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कदम हे करीत आहेत. घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे.