छत्रपती संभाजीनगर - सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये संपूर्ण मराठवाड्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला होता. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून त्याचा अहवाल समोर आला आहे. यात मराठवाड्यातील ६ हजार गावांत २३ लाख १० हजार ७७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. आता शेतपीक पाहणीचा अहवाल समोर आला असल्याने तातडीने मदत मिळण्याची आशा व्यक्त करत आहे.
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात ३१ ऑगस्टच्या रात्रीपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. १ सप्टेंबरलाही पावसाचा जोर कायम होता. या २४ तासांत मराठवाड्यात ८७.१ मिमी पाऊस झाला. त्यात विभागातील तब्बल २८४ मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली. या दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती
निर्माण झाली होती. पुढील तीन ते चार दिवसही सर्वदूर पाऊस झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीत २२ लाख ५३ हजार ६६१ हेक्टरवरील जिरायत, १७ हजार ९०९ क्षेत्रावरील बागायत तर ३९ हजार १९९ हेक्टरवरील फळपिकांना जबर फटका बसला. यात सर्वाधिक म्हणजे ५ लाख ८९ हजार १८३ हेक्टर हे एकट्या नांदेड जिल्ह्यात वाधित झाले आहे. सर्वात कमी नुकसान धाराशिव जिल्ह्यात ६,०६० क्षेत्राचे झाले आहे.