मराठवाडा

Lok Sabha Election 2024 | लातूर : भाजपसाठी रान मोकळे, काँग्रेसची परीक्षा

Shambhuraj Pachindre
लातूर : सर्वमान्य व सक्षम उमेदवारांची वाणवा, शिवराज पाटलांसारख्या नेत्याचा सक्रिय राजकारणातील जेमतेम सहभाग, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकरांची उणीव, लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत दोनदा लागलेली वाट यांमुळे काँग्रेसचा आत्मविश्वास जायबंदी झाला असून, भाजपची मात्र चलती आहे. होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडे उमेदवार तयार असून, विजयाचे सातत्य कायम ठेवण्यासाठी या पक्षाने तयारीही सुरू केली आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत विजयाचे शिलेदार झालेले खासदार सुधाकर शृंगारे यांना पक्ष पुन्हा संधी देईल अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे.  (Lok Sabha Election 2024)
काँग्रेसचा बालेकिल्ला अशी लातूर लोकसभा मतदाससंघाची ओळख काँग्रेसचे नेते मोठ्या विश्वासाने सर्वांना देत असत. या मतदारसंघातील विजयाचा आलेख पहाताना गल्लीपासून दिल्लीपर्यंत ही व्याख्या सर्वांनी मान्यही केली होती. काँग्रेस उमेदवाराच्या विजयातील सातत्य हे येथील काँग्रेसच्या नेतृत्वाची व पदाधिकारांच्या निष्ठेची पावती होती, तथापि काँग्रेस नेतृत्वातील अंतर्गत गटबाजी अन् वाढत्या कुरघोड्यांनी या ओळखीला दृष्ट लागली अन् 2004 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या शिवराज पाटलांचा पराभव करीत भाजपच्या रूपाताई दिलीपराव पाटील निलंगेकर खासदार झाल्या. पुढे हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाला व काँग्रेसचे जयंतराव आवळे विजयी झाले. त्यानंतर 2014 मध्ये आलेल्या मोदी लाटेने काँग्रेसची पिछेहाट सुरू झाली. त्याला लातूर लोकसभा मतदारसंघही अपवाद राहिला नाही. भाजपचे सुनील बळीराम गायकवाड विजयी झाले. मोदी लाटेतल्या विजयाचे हे सातत्य 2019 च्या निवडणुकीतही भाजपने जपले व सुधाकर शृंगारे हे खासदार झाले. सध्या केंद्र व राज्यात भाजपचे सरकार, आणलेल्या योजना, उपक्रम, पक्ष संघटन मजबुतीकरणावरचा भर व कार्यकर्त्यांची भक्कम पलटण, समविचारी संघटनांची साथ यांमुळे भाजपची बाजू भक्कम झाली आहे.
स्थानिक पातळीवर नेतृत्वात अंतर्गत मतभेद असले, तरी ते पक्षाची धोरणे राबविण्यात मागे नाहीत. भाजपकडून माजी खासदार सुनील गायकवाड यांचे थोरले बंधू अभियंता अनिल गायकवाड यांचे नाव चर्चेत होते, तथापि गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झाल्यावर त्यांचे नाव आता मागे पडले आहे. माजी आमदार सुधाकर भालेराव व दिग्विजय काथवटे याच्या नावांची चर्चा झडते, तथापि विद्यमान खासदार शृंगारे यांचेच नाव आघाडीवर आहे. खासदार सुधाकर शृंगारे यांचा विनम— स्वभाव, त्यांचे सर्वांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, पक्षसंघटन मजबुतीसाठीचे योगदान, त्यांनी केलेली कामे, आणलेल्या योजना, सभागृहातील अधिक उपस्थिती, विचारलेले प्रश्न, तसेच त्यांचे सामाजिक कार्यांतील योगदान ही त्यांच्यासाठी जमेची बाजू असणार आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या गटातील विद्यमान कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचे नावही चर्चेत आहे, तथापि विजयासाठी बंदा रुपया ठरलेला हा मतदारसंघ भाजप इतरांना सोडण्याचा वेडेपणा करणार नाही. काँग्रेसच्या गोटात मात्र अजून शांतताच आहे, तथापि गेल्या निवडणुकीत उमेदवारी मिळवलेले पुणे येथील उद्योजक मच्छिंद्र कामत यांच्यासह सनदी अधिकारी भा. ई. नगराळे , लातूरचे डॉ. शिवाजी काळगे, पृथ्वीराज सिरसाठ, माजी जि. प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे ही नावे काँग्रेसकडून शर्यतीत असू शकतात व ही मंडळी तसा दावाही करू शकतात. याशिवाय दुसरे नावही असू शकते.

…काँग्रेस इच्छुकच नाही

पक्षसंघटन मजबुती, कार्यकर्ते आदींबाबत काँग्रेस तशी सतर्क व गंभीरही नाही. विशेष म्हणजे लातूर लोकसभा निवडणुकीबाबत काँग्रेस फारशी इच्छुक नाही, याचा अप्रत्यक्ष दाखला नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत मिळाला आहे. निवडणूक स्वतंत्र लढवणार की मित्रपक्षांना सोबत घेणार? जागावाटप कसे असेल? उमेदवार कोण असेल? यांवर शिक्कामोर्तब झाल्यास सारे काही स्पष्ट होणार  आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT