Zilla Parishad will get a woman president for the fourth time
लातूर पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांचे आरक्षण जाहीर केले असून लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी सुटले आहे. या आरक्षणामुळे लातूरला चौथ्यांदा महिला अध्यक्ष मिळणार आहे.
लातूर जिल्हा परिषदेची स्थापना १९९२ साली झाली. तेव्हापासून २०२२ पर्यंत १३ अध्यक्ष लाभले आहेत. जिल्हा परिषदेला १९९२ साली पहिले अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपराव देशमुख लाभले. त्यांच्यानंतर १९९७ साली साहेरा जावेद मिर्झा, १९९८ साली अशोक पाटील निलंगेकर, १९९९ साली मिठाराम रूपचंद राठोड, २००२ साली अँड. बब्रुवान विठ्ठलराव काळे, २००५ साली भाजपचे ग्यानोबा तुकाराम घुमनवाड, २००७ साली छाया मारुती चिगुरे, २००९ साली काँग्रेसचे पंडित विठ्ठलराव धुमाळ, २०११ साली संतोष भाऊसाहेब देशमुख, २०१२ साली दत्तात्रेय गुंडेराव बनसोडे, २०१४ साली प्रतिभाताई शिवाज-ीराव पाटील कव्हेकर, २०१७ साली भाजपचे मिलिंद मडोळप्पा लातूरे व २०२० साली राहुल गोविंदराव केंद्रे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यकाळ पाहिला. एप्रिल २०२२ मध्ये जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपला आणि त्यावेळी पासून ते आजतागायत जिल्हा परिषदेचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी हेच प्रशासक म्हणून सांभाळत आहेत. आज लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलासाठी आरक्षित झाले आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्यातील १० पंचायत समिती सभापतिपदाचे संख्यात्मक आरक्षण ग्रामविकास विभागाने काढले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी पुरुष व महिला प्रत्येकी एक, ओबीसीसाठी पुरुष एक व महिला दोन, खुल्या प्रवर्गासाठी पुरुष तीन व महिला दोन असे आरक्षण राहणार आहे. पंचायत समितीनिहाय सभापतिपदाचे आरक्षण जिल्हा निवडणूक विभागाकडून काढण्यात येणार आहे.
२०१७ साली भाजपाने काँग्रेसला सत्तेतून हद्दपार करीत ३६ जागांवर विजय मिळवला होता. शिवसेना १, काँग्रेस १५ व राष्ट्रवादी काँग्रेसला ५ जागा मिळाल्या होत्या. जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून मिलिंद लातुरे बिनविरोध झाले तर रामचंद्र तिरुके उपाध्यक्ष बनले. अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर जानेवारी २०२० मध्ये अध्यक्षपद ओबीसी प्रवर्ग पुरुषासाठी सुटले आणि राहुल केंद्रे अध्यक्ष व भारतबाई सोळुंखे या उपाध्यक्ष बनल्या.