Ramdas Athawale 
लातूर

Ramdas athawale demand | प्रभाग पद्धती रद्द करावी, आठवले यांची मागणी

गरज भासल्यास न्यायालयातही दाद मागणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे

पुढारी वृत्तसेवा

लातूर: विद्यमान प्रभाग पद्धतीमुळे स्वबळावर आमच्या पक्षास निवडणुका जिंकता येत नाहीत त्यामुळे प्रभाग पद्धत रद्द करुन वॉर्ड पद्धत पूर्ववत करावी अशी आपल्या पक्षाची मागणी असून याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून गरज भासल्यास न्यायालयातही दाद मागणार आहोत, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी (दि. २६) रोजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

आठवले म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत आम्हाला विशेष काही मिळाले नाही. काही ठिकाणी जागा आल्या असल्या तरी त्या आम्हाला मित्र पक्षांच्या चिन्हावर लढाव्या लागल्या. मात्र यापुढे आम्ही तसे होऊ देणार नाही. आमच्याच चिन्हावर त्या लढवू. अमेरिकेशी भारताचा झालेला करार हा देशाच्या प्रगतीसाठी पोषक आहे. राहुल गांधी यांना बोलू दिले जात नाही या आरोपात काहीच तथ्य नाही. चुकीचे कोणी बोलत असेल तर त्याचे माईक बंद करण्याचा अधिकार सभापतींना असतो तो त्यांनी वापरला. त्यांनी राहूल गांधींचे तोंड बंद केले नाही केवळ माईक बंद केले असा टोला आठवले यांनी लगावला.

शरद पवार एनडीएचे घटक असते तर ते राष्ट्रपती झाले असते. आपण एनडीएचा घटक पक्ष असल्यामुळे आपली राज्यसभेची जागा निश्चित असल्याचे ते म्हणाले. अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबाबत सखोल चौकशी झाली पाहिजे.

सुप्रीम कोर्टाने राम मंदिराचा विषय ज्या पद्धतीने हाताळला तशाच पद्धतीने बिहारमधील महाबोधीविहारचा विषय हाताळला जावा आणि बौद्ध समाजाच्या लोकांना ट्रस्ट वरती घेण्यात यावे ही आपली मागणी असून याबाबत लवकर निर्णय व्हावा अशी आपली देखील अपेक्षा असल्याचे आठवले यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस राजाभाऊ सरवदे, चंद्रकांत चिकटे आदिसह अनेकांची उपस्थिती होती.

... तर ती जागाही आमचीच

काँग्रेस, उबाठा व शरद पवार राष्ट्रवादी हे एकीने राहिले तर ते राज्यसभेची एक जागा जिंकू शकतात. शरद पवार या जागेसाठी इच्छुक असले तरी त्यांच्या मित्र पक्षाची यासाठी तयारी नाही. त्यांच्यातला वाद असाच राहिला तर ही जागा महायुती लढवू शकते, त्याला लागणारे संख्याबळ कसे जुळवायचे हे आम्हाला माहिती आहे, तथापि आमची फोडाफोडीची इच्छा नसल्याचे आठवले म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT