Latur Unseasonal Rain
अहमदपूर : अहमदपूर शहरासह तालुक्यात वादळी वारा, विजांसह वळीव पावसाने आज (दि. २६) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास हजेरी लावली. प्रचंड उकाड्यापासून नागरिकांना थोडीफार दिलासा मिळाला आहे. मात्र, शेतातील काढणीस आलेली ज्वारी, आंबा पिकांचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे.
मागच्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट कायम असतानाच आज दिवसभर वातावरणात बदल जाणवत होता. थोडासा हलका वारा व ढगाळ हवामान यामुळे वातावरणात काहीतरी बदल घडणार याचा अंदाज येत असतानाच सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक जोराचा वारा, विजांचा कडकडाट यासह पावसाला सुरुवात झाली.
जवळपास पाऊण तास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. दरम्यानच्या काळात शहरातील व परिसरातील वीज गायब झाल्यामुळे अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागले. अचानक आलेल्या वळीव पावसाने कामावरून घरी जाणार्यांची मात्र तारांबळ उडाली.