Latur News : वर्षभराच्या मेहनतीचे डोळ्यादेखत होतेय सरपण file photo
लातूर

Latur News : वर्षभराच्या मेहनतीचे डोळ्यादेखत होतेय सरपण

पाणीटंचाईग्रस्त गावांतील तोडणीला प्राधान्य हवे

पुढारी वृत्तसेवा

The severity of the drought has intensified in Ausa taluka. Due to a lack of water, the standing sugarcane crop has begun to wither

औसा, पुढारी वृत्तसेवा : औसा तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढल्याने पाण्याअभावी शेतातील उभा ऊस आता डोळ्यादेखत वाळू लागला आहे. लाखो रुपये खर्चुन वर्षभर जोपासलेले पीक सरपण होण्याची वेळ आली असतानाच, साखर कारखान्यांच्या ऊसतोडणीला अपेक्षित गती मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. पिकाला पाणी नाही; तोडणीही वेळेत होत नसल्याने पाणीटंचाईग्रस्त गावांतील ऊसतोडणीला तातडीने प्राधान्य देण्याची मागणी होत आहे.

तालुक्यातील गेल्या ४ महिन्यांपासून पुरेसे पाणी मिळत नसल्याने उसाची वाढ खुंटली आहे. काही शेतकरी जनरेटरच्या साहाय्याने पाणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण डिझेलचा खर्च आणि अनियमित वीजपुरवठ्यामुळे हा पर्याय परवडेनासा झाला आहे.

तालुक्यात मांजरा, संत शिरोमणी मारुती महाराज, नीलकंठेश्वर हे ३ सहकारी आणि १ खासगी साखर कारखाना आहे. या कारखान्यांच्या तोडणी यंत्रणेकडून वेळेत ऊसतोडणी होत नसल्याने चिंता वाढली आहे. हार्वेस्टरद्वारे काही ठिकाणी तोडणी सुरू असली; तरी सर्व ऊस वेळेत गाळपासाठी जाईल याची खात्री नाही. उसाच्या उत्पन्नावरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन, मुलांचे शिक्षण आणि कर्जाची परतफेड अवलंबून असते.

कारखाना प्रशासनाने पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन गावनिहाय विशेष नियोजन करावे. ज्या गावांत पाणी उपलब्ध नाही आणि ऊस वाळण्याच्या स्थितीत आहे, तिथल्या उसाला प्रथम प्राधान्य देऊन तोडणी मजुरांच्या टोळ्या तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जयपाल ठाकूर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT