The newlywed woman died during childbirth.
अहमदपूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील धानोरा एका (खु.) येथील नवविवाहितेचा पहिल्या बाळंतपणादरम्यान मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. दिपाली दयानंद वाघमारे (वय २३) असे मयत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, वेळेत उपचार न मिळाल्यामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी केला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी की, धानोरा (खु.) येथील दिपाली वाघमारे या विवाहितेला पहिल्या बाळंतपणासाठी १५ डिसेंबर रोजी अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. प्रारंभी उपचार सुरू असताना प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र १६ डिसेंबर रोजी दुपारी विवाहितेची प्रकृती अत्यवस्थ झाली. पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविले. मात्र, वाटेतच तिचा मृत्यू झाला. लातूर येथील डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. सदरील घटनेनंतर नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांनी वेळेवर उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत अहमदपूर पोलिसात बुधवारी अकस्मात मृत्यूची नोंद ८६/२०२५ कलम १९४ बी.एन.एस. नुसार केली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव या करीत आहेत.