Latur News : वाळत असलेला अपरिपक्व ऊस शासनाने खरेदी करावा file photo
लातूर

Latur News : वाळत असलेला अपरिपक्व ऊस शासनाने खरेदी करावा

दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत आ. पवारांची मागणी, महसूलमंत्र्यांचे अहवाल सादर करण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

The government should purchase the immature sugarcane that is currently drying up

लातूर, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळामुळे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत उसाची वाढ खुंटली असून, शेतातच ऊस वाळत आहे. या अपरिपक्व उसाची शासनाने योग्य मोबदला देऊन खरेदी करावी आणि त्यापासून मुरघास तयार करून जनावरांना उपलब्ध करून द्यावा. तसेच रोजगार हमी योजनेतील चारा लागवडीचे आर्थिक मापदंड पूर्ववत करावेत, अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत केली.

मुंबई येथे बुधवारी (दि. २५) झालेल्या बैठकीत त्यांनी या मागण्या मांडल्या. बैठकीस उपसमितीचे सदस्य गिरीश महाजन, भरत गोगावले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अपुऱ्या पावसामुळे जवळपास ४० टक्के शेतकऱ्यांचा ऊस सात ते आठ कांड्यांवरच राहिला आहे. अपरिपक्च उसाला साखर उतारा मिळण्याची शक्यता कमी असल्याने कारखाने गाळप करणार नाहीत आणि शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे.

त्यामुळे महसूल प्रशासन व साखर कारखान्यांच्या माध्यमातून अशा उसाचे सर्वेक्षण करून वजनानुसार खरेदी करावी. त्यापासून मुरघास तयार करून चारा डेपोंमार्फत जनावरांना पुरवावा, अशी सूचना त्यांनी केली. ऊस खरेदी शक्य नसल्यास पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी पर्यायी मागणीही केली. चारा लागवड योजनेच्या आर्थिक तरतुदीतील कपातीचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

२३ ऑक्टोबरच्या मूळ योजनेत मल्टिकट चारा पिकासाठी प्रतिएकर सुमारे एक लाख २१ हजार रुपयांची तरतूद होती. मात्र, ६ नोव्हेंबरच्या शासन निर्णयात ती प्रति हेक्टर ५० हजार रुपयांपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. त्यामुळे मजुरीचे दर व इतर आर्थिक तरतुदी पूर्ववत कराव्यात. तसेच १० गुंठे ते एक एकर क्षेत्र असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी त्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. दरम्यान या मागण्यांची दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सविस्तर अभ्यास करून पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT