शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ येथील भारतीय स्टेट बँकेचे ऐन दिवाळीच्या सणात कुलूप लावून कामकाज सुरू असल्याने बँकेत विविध कामकाजासाठी येणाऱ्या महिला, पुरुषांसह बँकेच्या ग्राहकाना कुलूप उघडण्याच्या प्रतीक्षेत तासन् तास ताटकळत उभा टाकण्याची वेळ आली असून, दिवाळीच्या सणात तरी कुलूप लावून कामकाज करण्यात येऊ नये अशी मागणी ग्राहकातुन केली जात आहे.
शिरूर अनंतपाळ येथे तालुका निर्मितपूर्वी भारतीय स्टेट बँकेची सुरवात करण्यात आली आहे. परंतु तालुका निर्मितनंतर बँकेच्या ग्राहक संख्येत मोठी वाढ झाली असून, त्यापटीत बँकेचे उपलब्ध मनुष्यबळ कमी असल्यामुळे बँकेच्या विविध कामासाठी ग्राहकाना खेटे घालावे लागतात. एवढेच नव्हे तर दुपारच्या मध्यान्ह भोजनाच्या वेळी लंच टाईम झाल्याचे सांगून बँकेच्या शटरला कुलूप लावले जाते. त्याच बरोबर ४ वाजल्यानंतर बँकेच्या व्यवहाराची वेळ झाल्याचे सांगून पुन्हा शटर लॉक केले जाते.
लंच टाईम तसेच व्यवहार संपल्याच्या वेळेनंतर बँकेत काही काम असेल तर शटरचे कुलूप उघडण्याची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे ग्राहकाना ऐन दिवाळीच्या सणात तासन् तास ताटकळत उभा टाकवे लागत आहे. त्यातच लाडकी बहीण योजनेच्या अनेक लाभार्थी महिला सणाच्या तोंडावर लाडकी बहीण म्हणून मिळालेल्या अनुदानचे पैसे उचलण्यासाठी येत आहेत. त्याना सुध्दा अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे, म्हणून किमान सणाच्या तोंडावर तरी शटर लॉक करण्यात येऊ नये अशी मागणी बँकेच्या ग्राहकांतून करण्यात येत आहे.
बँकेत पैसे भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी येणारे लोक पासबुक घेऊन येतात परंतु बँकेचे प्रिंटर गेली अनेक दिवसांपासून बंद असल्याने जमा उचल रकमेची अपडेट स्थिती समजत नाही. त्यामुळे पासबुक प्रिंटर असून अडचण आणि नसून खोळंबा झाला असल्यामुळे प्रिंटर दुरुस्तीची मागणी बँकेच्या ग्राहकांतून केली जात आहे.
बँकेत विविध कामकाजासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या समस्यांबाबत जिल्हा लिड व्यवस्थापक प्रमोद शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले बँकेत येणाऱ्या ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी शाखा व्यवस्थापकास तातडीने सूचना देण्यात येतील.