सावरी येथे बोटीद्वारे अवैध वाळू उपसा; शेतकऱ्यांतून संताप pudhari photo
लातूर

Latur illegal sand mining : सावरी येथे बोटीद्वारे अवैध वाळू उपसा; शेतकऱ्यांतून संताप

महसूल प्रशासनाचा निष्काळजीपणा, तालुक्यात ठिकठिकाणी अवैध वाळू उपसा

पुढारी वृत्तसेवा

निलंगा : तालुक्यातील सावरी येथील नदीपात्रात बोटीद्वारे अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असून यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान होत आहे.

सावरी येथील गट क्रमांक 75 मध्ये निम्न तेरणा नदीपात्रालगत असलेल्या शेतांजवळ गेल्या अनेक दिवसांपासून वाळू माफियांनी बोटीद्वारे व कॉम्प्रेसर मशीनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू केला आहे.

या बेकायदेशीर उपशामुळे नदीकाठची माती ढासळून शेतजमीन नदीपात्रात खचत आहे. परिणामी, म्हेकरे व जाधव यांच्या शेतीतील पिकांचे मोठे नुकसान होत असून जमिनीची धूप वाढत आहे. या प्रकारावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी महादू शिवाजी म्हेकरे व कलावती लक्ष्मणराव जाधव यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून केवळ तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना वाढत आहे. त्यामुळे अवैध वाळू उपसा तत्काळ थांबवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान याबाबत नायब तहसिलदार आळंदकर यांनी सावरी येथे अवैधरित्या बोटीद्वारे सुरू असलेल्या वाळू उपशसंदर्भात मंडळाधिकारी व तलाठी यांना पाठवले आहे. ज्या ठिकाणी अवैध उपसा आढळेल, तेथे निश्चित कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

  • तालुक्यातील बामणी, धानोरा, कोकळगाव, मदनसुरी, सावरी, औराद शहाजनी, येळनूर-गुंजरगा, शिऊर, गिरकचाळ आदी ठिकाणीही मोठ्या प्रमाणात बोटीद्वारे अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे समोर येत आहे. महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून काही ठिकाणी महसूल प्रशासन व वाळू माफियांसोबत लागेबांधे असल्याच्या चर्चाही रंगत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT