उदगीर : उदगीर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे विद्यमान मंत्री संजय बनसोडे हे मोठया मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात गेलेले माजी आ. सुधाकर भालेराव यांचा ९३,२१४ मताने पराभव केला. या विजयाने उदगीर मतदार संघातील मतदारांवर कुठल्याच फॅक्टरचा परिणाम झाला नसून मतदारांनी विकासाच्या फॅक्टरला पसंती देत संजय बनसोडे यांना कौल दिला आहे.
पहिल्या फेरी पासूनच मंत्री संजय बनसोडे यांनी आघाडी घेतली होती. ती आघाडी वाढतच गेली. शेवटी ते मोठया मताधिक्याने विजयी झाले. संजय बनसोडे यांनी १,४९,७६६ मते घेतली तर सुधाकर भालेराव यांना ५७,७०५ मते मिळाली.
पहिल्या फेरीत संजय बनसोडे यांनी ४१८० मताची आघाडी घेतली होती. ती प्रत्येक फेरीत वाढतच गेली. मतमोजणीच्या एकूण २६ फेर्या होत्या. या २६ फेर्यातही संजय बनसोडे यांची मताची आघाडी होती. पोष्टल मतातही २२७२ मते घेत त्यांनी ११५५ मताची आघाडी घेत पोष्टलसह ११५५ च्या आघाडीसह ९३२१४ मताधिक्याने विजय मिळविला. विजयानंतर शासकिय आयटीआय पासून भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी आ.गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, बस्वराज बागबंदे, सुधीर भोसले, गणेश गायकवाड, मनोज पुदाले, विजय निटुरे, शहाजी पाटील तळेगावकर, अनिल मुदाळे, दत्ता पाटील, उत्तराताई कलबुर्गे आदीसह महायुवतीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.