लातूर :शासनाने तेरणा नदीवरील किल्लारी क्र. 2 (लातूर पद्धती) बंधाऱ्याच्या यांत्रिकी व विद्युत घटकांच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 86 लाख रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली आहे. आ. अभिमन्यू पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. धरण सुरक्षितता आणि सुलभ द्वार परिचालनाच्या दृष्टीने ही दुरुस्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
किल्लारी क्र. 2 बंधारा हा लातूर जिल्ह्यातील किल्लारी क्र. 2 गावाजवळ तेरणा नदीवर उभारण्यात आला असून, तो तेरणा धरण स्थळापासून सुमारे 25.05 कि.मी. अंतरावर आहे. या बॅरेजचा एकूण संकल्पित पाणीसाठा 1.304 दशलक्ष घनमीटर असून 194 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याची क्षमता आहे.
सन 2015 मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला आणि त्याच वर्षी प्रथमच पाणी साठविण्यात आले. त्यानंतर सन 2019 मध्ये प्रकल्प व्यवस्थापन विभागाकडे देखभाल व द्वार परिचालनासाठी हस्तांतरित करण्यात आला.मात्र प्रकल्प पूर्ण झाल्यापासून बंधाऱ्यातील द्वारे व उच्चालक यंत्रणेची आवश्यक दुरुस्ती झालेली नव्हती.
मुख्य अभियंता (यांत्रिकी), जलसंपदा विभाग, नाशिक यांनी दि. 12 सप्टेंबर 2023 रोजी मांजरा नदी खोऱ्यातील विविध बंधारे व बॅरेजची पाहणी केली असता, यांत्रिकी व विद्युत घटकांच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये किल्लारी क्र. 2 बंधाऱ्याचाही समावेश करण्यात आला होता. महामंडळ स्तरावर निधी उपलब्ध नसल्यामुळे ही कामे विशेष दुरुस्ती अंतर्गत प्रस्तावित करण्यात आली होती.
आमदार अभिमन्यू पवार यांनी यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर शासनाने 1.86 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली.या दुरुस्तीमुळे बंधाऱ्याच्या द्वारांतून होणारी पाण्याची गळती थांबणार असून संपूर्ण पाणीसाठा प्रभावीपणे उपलब्ध होईल. परिणामी रब्बी व उन्हाळी हंगामात सिंचनासाठी आवश्यक पाणी पूर्ण क्षमतेने उपलब्ध होणार आहे.
तसेच द्वारांचे सुलभ परिचालन शक्य होऊन पूरस्थितीत बंधाऱ्याची सुरक्षितता अधिक बळकट होईल.धरण सुरक्षितता अंतर्गत किल्लारी क्र. 2 बंधारा ‘निर्दिष्ट धरण’ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक यांत्रिकी व विद्युत घटकांची दुरुस्ती करणे बंधनकारक आहे. मंजूर निधीमुळे ही कामे लवकरच मार्गी लागणार असल्याने किल्लारी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण झाल्यास सिंचन व्यवस्थेला चालना मिळून शेती उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आ. अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे या महत्त्वाच्या प्रकल्पाला गती मिळाल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आ. अभिमन्यू पवार यांनी आभार व्यक्त केले.