Latur Agriculture News : शेंगाच लागल्या नाहीत; चार एकर सोयाबीनवर रोटावेटर ! file photo
लातूर

Latur Agriculture News : शेंगाच लागल्या नाहीत; चार एकर सोयाबीनवर रोटावेटर !

उजनीतील हतबल शेतकऱ्याचा निर्णय; एकरी २५ हजारांचा खर्च मातीत

पुढारी वृत्तसेवा

Rotavator on four acres of soybeans!

औसा, पुढारी वृत्तसेवा : दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने औसा तालुक्यातील खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. पावसाअभावी सोयाबीनला शेंगाच न लागल्याने उजनी येथील शेतकरी सोमनाथ रंदवे यांनी अखेर आपल्या चार एकर उभ्या सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवला. एकरी सुमारे २५ हजार रुपये खर्च करूनही हातात काहीच न उरल्याने उभे पीक मातीत गाडण्याची वेळ त्यांच्यावर आली. दुष्काळाची तीव्रता आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर अशा प्रकारे उभी ठाकली आहे.

यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाने शेतकऱ्यांची परीक्षा घेतली. पावसाने ओढ दिल्याने अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. रंदवे यांनीही मोठ्या आशेने दुसऱ्यांदा सोयाबीनची पेरणी केली. पेरणीपूर्व मशागत, बियाणे, खते आणि औषध फवारणी यासाठी एकरी सुमारे २५ हजार रुपये खर्च झाला.

दुबार पेरणीनंतर पीक कसाबसा तग धरून फुलोऱ्यात आले. आता पावसाची दमदार सर आली तर शेंगा भरतील आणि हंगाम हाताशी येईल, अशी आशा होती. मात्र, याच निर्णायक काळात पावसाने तब्बल दोन महिन्यांपासून दडी मारली. कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा संपला. सोयाबीनची वाढ खुंटली आणि शेंगाच धरल्या नाहीत. हिरवाईच्या जागी शेतात वाळलेल्या ताटांचे चित्र दिसू लागले. पीक काढणीयोग्य राहिले नाही. सोयाबीनवर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घेतला.

रंदवे यांचे चार एकर सोयाबीन रोटावेटरखाली जाणे ही केवळ एका शेतकऱ्याची व्यथा नाही. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे औसा तालुक्यातील खरीप हंगामावर ओढवलेल्या संकटाचे हे जिवंत चित्र आहे. दुबार पेरणी करूनही निसर्गाने साथ न दिल्याने उत्पादन खर्च वाया गेला असून, अनेक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने औसा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची तातडीने पाहणी करून पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, तसेच बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीकविमा आणि दुष्काळी सवलतींचा लाभ तातडीने द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

काढणीचा खर्चही परवडेना

उरले-सुरले पीक काढण्यासाठी हार्वेस्टरला एकरी सुमारे २,५०० रुपये, तर मजुरांकडून काढणी केल्यास सुमारे ३,५०० रुपये खर्च येणार होता. आधीच पीक वाचवण्यासाठी मोठा खर्च झालेला असताना उत्पन्नाची कोणतीही शाश्वती नसल्याने पुन्हा काढणीवर पैसा खर्च करणे रंदवे यांना शक्य नव्हते. अखेर काढणीचा खर्चही निघणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी उभ्या पिकावर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घेतला.

शेतात फक्त वाळलेली धाटे उरली होती. दुबार पेरणी करूनही निसर्गाने साथ दिली नाही, एकरी २५ हजार रुपये खर्च करूनही शेंगाच लागल्या नाहीत. काढणीचा खर्चही परवडत नसल्याने डोळ्यांदेखत पीक जळताना पाहण्यापेक्षा रोटावेटर फिरवण्याशिवाय पर्याय उरला नाही.
सोमनाथ रंदवे, शेतकरी, उजनी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT