Rock smuggling business in Shirur Anantpal taluka, administration's eyes opened after 'Pudhari' news, tractor seized
शिरूर अनंतपाळ, पुढारी वृत्तसेवा : पुढारीने प्रसिध्द केलेल्या बातमीनंतर शिरूर अनंतपाळ महसुल प्रशासनाने होनमाळ येथे छापा टाकून अवैद्य खडक (मुरूम) असेलेले ट्रॅक्टर जप्त केले आहे. या कारवाईने पुढारीने बातमीद्वारे मांडलेल्या वास्तवावर शिक्कामोर्तब झाले आहे. शीरूर अनंतपाळ तालुक्यात खडकाची तस्करी होत होती. याबात दैनिक पुढारीने यावर तहसील अधिकाऱ्यांच्या साह्याने मोठ्या प्रमाणात खडकाची तस्करी, शिरूर अनंतपाळ तालुक्यात चर्चेला उधाण या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केल्यानंतर तहसील प्रशासनाला जाग आली. प्रभारी तहसीलदार लालासाहेब कांबळे यांनी तातडीने पथक स्थापन करून सदर ठिकाणी छापा टाकला व उत्खनन सुरू असलेला ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उभा करण्यात आला. तसेच या कारवाईचा अहवाल उपविभागीय अधिकारी, निलंगा यांच्याकडे पुढील कारवाईसाठी सादर करण्यात आला आहे.
शिरूर अनंतपाळ येथील गट क्रमांक २०७/२७९ व, क्षेत्र १.५० हेक्टर आर असलेल्या मालमत्तेत उद्धव बाबुराव शिवणे यांच्या शेतात गौण खनिजाचा अनधिकृत उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर महसूल पथकाने कारवाई केली. सदर ठिकाणी ट्रॅक्टर (चक २४ ड ५५०३) मुरूम भरून नेत असताना आढळून आला. ट्रॅक्टर चालक मनोहर गोविंद तांदळे याने, हा मुरूम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.
मात्र विचारणा केल्यानंतरही त्याच्याकडे ना कोणतीही अधिकृत परवानगी होती, ना रॉयल्टीची पावती, त्याने परवानगीसाठी अर्ज केलेला असल्याचे सांगितले, पण अधिकृत परवानगी अद्याप मिळालेली नसल्याचे स्वतः कबूल केले. सदर प्रकरणी मंडळ अधिकारी खंदाडे, ग्राम महसूल अधिकारी मारुती कुकर, बबन राठोड व डी. बी. तसेच पंच नागरिक यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. या पंचनाम्यात, सदर उत्खनन कोणतीही वैध परवानगी नसल्यामुळे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
ट्रॅक्टरचा मालक जीवन मोतीराम शिवणे असल्याचे चालकाने सांगितले आहे. या सगळ्या प्रकारामुळे महसूल विभाग आणि तहसील कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. प्रत्येक ट्रॅक्टरमागे हजारो रुपयांचे व्यवहार होत असल्याची जोरदार चर्चा आहे. नागरिकांच्या मते, यामागे महसूल अधिकाऱ्यांचा हात असल्याशिवाय इतका मोठा गैरव्यवहार शक्यच नाही.
प्रभारी तहसीलदार लाला कांबळे यांनी याबाबतची माहिती देताना सांगितले की, संपूर्ण प्रकरणाचा अहवाल उपविभागीय अधिकारी, निलंगा यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. आता प्रत्यक्ष दोषींवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दैनिक पुढारीच्या वृत्ताने एक गंभीर प्रशासकीय लपवाछपवी उघडकीस आणली आहे. मात्र ट्रॅक्टर जप्त करून कारवाईचे नाटक उरकले जाईल की खरे दोषी अधिकारी आणि खाजगी व्यक्तींवर कठोर कारवाई होईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अन्यथा लोकांमध्ये असलेल्या नाराजीचे तीव्र जनआंदोलनात रूपांतर होण्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.