शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील बाकली-बिब्राळ परिसरालगत असलेल्या मांजरा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात महसूल प्रशासनाच्या गौण खनिज पथकाने मोठी कारवाई करत 6 ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहेत. त्यापैकी 2 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव संबंधित कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौण खनिज पथकाने मांजरा नदीपात्रात अचानक छापा टाकून अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. यावेळी एकूण 6 ट्रॅक्टर पकडण्यात आले.दरम्यान, कारवाईदरम्यान उर्वरित 4 ट्रॅक्टर चालकांनी वाहने घटनास्थळावरून पळवून नेली. त्यामुळे संबंधित वाहने शोधून ताब्यात घेण्यासाठी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना महसूल विभागाकडून पत्र देण्यात आले आहे.
ही वाहने ताब्यात आल्यानंतर त्यांच्याविरुद्धही नियमानुसार गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल प्रशासनाने स्पष्ट केले आहे.अवैध गौण खनिज उत्खननामुळे नदीपात्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पर्यावरणालाही धोका निर्माण होत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहतील, असा इशारा महसूल विभागाने दिला आहे.
मांजरा नदीपात्रातील अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात कारवाई करण्यात आली असून 6 ट्रॅक्टर पकडण्यात आले आहेत. 2 वाहनांवर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. 4 ट्रॅक्टरना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आले असून, ती वाहने मिळाल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे शिरूर अनंतपाळचे नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे यांनी सांगितले.