Renapur Water in the field does not drain
विठ्ठल कटके
रेणापूर : रेणापूर तालुक्यात व रेणा मध्यम प्रकल्पाच्या परिसरात झालेल्या पावसामुळे २० ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत रेणा प्रकल्पातून जवळपास सोळा वेळेला रेणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करावा लागला. त्यामुळे शेतात साचलेले पाणी शेताच्या बाहेर न पडल्यामुळे शेतातील ऊस व सोयाबीनसह इतर सर्वच पिकांमध्ये आजही पाणी साचलेले आहे.
परिणामी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. "पूर ओसरेना आणि शेतातले पाणी कमी होईना " अशी स्थिती निर्माण झाली आहे. काढणीला आलेले सोयाबीन व दाना भरत असलेल्या ओल्या शेंगांना आता करे फुटत असल्याने उरले सुरले पिकही शेतकऱ्यांच्या हाती लागण्याची शक्यता धुसर होत आहे.
रेणा मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात ऑगष्ट महिन्यात सहा वेळा तर सप्टेंबर महिन्यात दहा वेळा पाणी सोडण्यात आले. २८ सप्टेंबरला सोडलेले पाणी ३० सप्टेंबरला सकाळी साडे आठ वाजता बंद करण्यात आले. या पाण्याचा नदीकाठच्या शेतात पिकांना मोठा फटका बसला. आजही तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात पाणी असल्याने शेतात जाता येत नाही. नदीचा पुर ओसरल्यावरच शेतात साचलेले पाणी शेताबाहेर पडेल. जर आनखी पाऊस झाला तर परिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील आठवड्यात खासदार, राज्याचे मंत्री, आमदार, माजी आमदार तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी नदीकाठच्या व इतर बाधीत क्षेत्राची पाहणी करून प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे सुचित केले होते. त्यानुसार महसुल कृषी व पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पंचनामे करण्याचे काम हाती घेतले ते जवळपास पुर्ण झाले आहे. तालुक्यातील किती शेतकऱ्यांना किती अनुदान मिळेल याचे आकडे वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत आहेत. प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा बँक खात्यावर किती व कधी अनुदान जमा होणार आहे या बावत शेतकऱ्यामध्ये साशंकता निर्माण झाली आहे.
वादळी वारे व अति पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस आडवा पडला आहे. बहुतांश जमिनी खरडुन गेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात रस्ते खराब झाले आहेत. अनेकांची घरे पडली आहेत. कांही पशुपालकांची जनावरे व मेंढ्यां दगावल्या आहेत. अनेकांच्या घरात पाणी शिरून त्यांच्या अन्न धान्याचे व जिवनावश्यक साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काढणीला आलेल्या व दाना भरलेल्या ओल्या शेंगांनाहि आता करे फुटत आहेत. आर्थिक मदतीसाठी कांही पक्ष व संघटना आंदोलने करीत आहेत.