लातूर : रेणापूर पोलिसांनी घरफोडी चोरीचा गुन्हा अवघ्या काही तासांत उघडकीस आणत चार आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत चोरीस गेलेला 6 लाख 60 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शेख जियाउद्दीन वलीयोद्दीन (रा. रेणापूर) यांच्या शेतातील आकाड्यावर असलेल्या पत्र्याच्या खोलीतून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी बॉक्स, लोखंडी अँगल व इतर साहित्य चोरी केले होते. याप्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांना आरोपी चोरीचा माल विक्रीसाठी पिंपळफाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून प्रवीण प्रकाश आडे (22), सुरज विनायक चव्हाण (19), विजय सुरेश चव्हाण (21) व एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून 1 एचपी पाण्याची मोटार, वॉशिंग मशीन, लोखंडी बॉक्स, सुमारे 1.50 लाख रुपये किमतीचे 10 लोखंडी अँगल तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले सुमारे 5 लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन जप्त करण्यात आले.
एकूण 6 लाख 60 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सुरू आहे.