रेणापूर : ग्रामीण भागात आठवडे बाजार व लहान मोठ्या किराणा दुकानात काळे तिखट , मिरचीपूड, वाटलेली हळद ,धने पावडर, जीरे, काळीमीरी , दालचीनी , लवंग, वेलदोडे यासह इतर खुल्या व सुट्या मसाल्यांची उघड्यावर सर्रासपणे विक्री केली जात आहे.
अशा सुट्या व खुल्या मसाल्यामध्ये कृत्रिमरंग, विषारी रसायने , लाकडाचा आणि यासह इतर घातक पदार्थांची मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने राज्यात अशा सुट्या व खुल्या मसाल्यांच्या विक्रीला बंदी घातलेली असून अनेक ठिकाणी धाडीही घालण्यात आलेल्या आहेत.
तसेच ज्या ठिकाणी मसाले उत्पादीत केले जातात अशा ठिकाणीच मसाले शीलबंद व पॅकींग करण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. नियम व अटीचे उल्लंघन करणारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सुचना देण्यात आल्या असतांनाही ग्रामीण भागातील आठवडी बाजारात उघड्यावर (त्यावर कसलेही झाकन नसतांना ) असे मसाले सर्रासपणे विकले जात आहेत. अशा व्यावसाईकांनी सर्वसामांन्यांच्या आरोग्याशी एक प्रकारे खेळच मांडलेला आहे अन्न व औषध प्रशासन अशा विक्रीवर चाप कसा लावणार असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात आठवडी बाजारात तसेच गल्ली बोळातील किराणा दुकानात उघड्यावर असे पदार्थ सर्रासपणे विकले जात आहेत ते पॅकिंग मसाल्यापेक्षा थोडे स्वस्त मिळतात म्हणून ग्राहकांचा असे मसाले खरेदी करण्याकडे अधिक कल असतो. तसेच महिला बचतगट व इतर गृहउद्योगातही घरच्या घरी विविध प्रकारचे मसाले तयार करून त्याची विक्री केली जात असते. अशा सुट्या व खुल्या मसाल्यात विटांचे पावडर , लाकडाचा भुसा यासह इतर शरीराला घातक असलेले पदार्थ मिसळले जातात.
अशा भेसळयुक्त मसाल्यांच्या सततच्या सेवनामुळे नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. बाजारात असे मसाले उघड्यावर ठेवण्यामुळे त्यावर धुळ साचते आणि प्रदुषण होऊन जंतुंचा प्रादर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. उघडे सुट्टे अथवा खुल्ले विनालेबल व पॅकिंग नसलेले मसाले खरेदी करु नयेत ते खरेदी करतांना आवश्यक त्या बाबी तपासुनच मसाले खरेदी करावेत असे अन्न व औषध प्रशासनाकडून आवाहन केले जाते. तसेच एफडीए च्या नविन नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्यान्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तरतुद करण्यात आली असतांनाही आठवडी बाजारात हळद पावडर ते मिरचीपासून इतर सर्व मिश्रीत मसाले सर्रासपणे विकले जात आहेत.
याकडे संबंधीत प्रशासन कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबतीत अन्न व औषध प्रशासनाने जे कडक नियम व कायदे केले आहेत ते केवळ किरकोळ किराणा दुकानापुरतेच मर्यादीत नसुन ते मसाल्याच्या उत्पादनापासून ते प्रक्रिया करण्यापर्यंतच्या संपूर्ण पुरवठा करणारांनाहि लागू आहेत. असे असतांनाही ग्रामीण भागात या नियमांना बगल देऊन अशा मसाल्यांची सर्रासपणे विक्री होतांना दिसत आहे.
अशा मसाल्यांमध्ये भेसळ होते की नाही याची तपासणीही कोणी करीत नाही. अन्न व औषध प्रशासनाकडुन केवळ शहरी भागातच अशा व्यावसाईकांविरोधात कारवाया केल्याच्या बातम्या ऐकु येतात. परंतु ग्रामीण भागातील आठवडी बाजारात व लहान लहान किराणा दुकानात असे खुल्ले व सुट्टे मसाले व इतर वस्तुंची सर्रासपणे विक्री होत असतांना याकडे संबंधीत प्रशासनाचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.