Renapur Kharif crops pudhari photo
लातूर

Renapur Kharif crops : दुष्काळाच्या उंबरठ्यावर रेणापूर; खरीप पिके करपली

पावसाची पावणेदोन महिन्यांपासून ओढ; विहिरी-बोअरवेल कोरडे, रेणा प्रकल्पात २० टक्केच पाणीसाठा

पुढारी वृत्तसेवा

विठ्ठल कटके

रेणापूर : रेणापूर तालुक्यात मागील पावणेदोन महिन्यांपासून पावसाने कमालीची ओढ दिल्याने हलक्या व माळरानावरील खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनसह इतर पिके करपून वाळत असून, आता पाऊस पडला तरी ही पिके सावरण्याची शक्यता कमी झाली आहे. डोळ्यादेखत हातचे पीक जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, कुटुंबाचा वर्षभराचा खर्च, पेरणीसाठी घेतलेले कर्ज फेडणे आणि आगामी रब्बीची पेरणी करणे कसे शक्य होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

गतवर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. रेणा नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या. शासनाकडून नुकसानभरपाई जाहीर झाली असली तरी काही शेतकऱ्यांना मदत मिळाली, तर काही अद्यापही त्यापासून वंचित आहेत. यंदा पावसाअभावी खरीप पिकांसह फळबागांवरही संकट ओढवले आहे.

फळझाडे कोमेजत असून, ती जगविण्यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यातील भूजलपातळीही झपाट्याने खालावत आहे. अनेक विहिरी व बोअरवेल कोरडे पडू लागले आहेत.

रेणा मध्यम प्रकल्पात अवघा २० टक्के जलसाठा शिल्लक असून, व्हटी प्रकल्प, पाझर तलाव तसेच मांजरा व रेणा नदीवरील बॅरेजमधील पाणीसाठाही संपत आला आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

या परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक दुष्काळाच्या छायेत आले आहेत. तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबतही नाराजी वाढत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी विविध संघटनांकडून शासन व प्रशासनाला निवेदने देण्यात येत आहेत. माजी आमदार धिरज देशमुख यांनी शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

आमदार रमेशअप्पा कराड यांनी लातूर ग्रामीणसह संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनीही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, रेणापूर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तालुकाध्यक्ष प्रमोद कापसे व शहराध्यक्ष नितीन मोटेगावकर यांच्या नेतृत्वाखाली १५ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर ‘जागर गोंधळ’ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हेक्टरी एक लाखाची मदत द्या

पिकांचे तातडीने पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा, दुष्काळी निकषांनुसार शेतकऱ्यांना मदत द्यावी, कृत्रिम पाऊस पाडण्याच्या मागणीचा शासनाने विचार करावा, सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा द्यावा, हेक्टरी एक लाख रुपयांची मदत आणि शेतमजूर कुटुंबांना २५ हजार रुपयांची विशेष मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. रेणापूर सेवा सहकारी संस्थेच्या १,४२८ शेतकऱ्यांचे कर्ज तातडीने माफ करावे तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान ५० हजारांऐवजी एक लाख रुपये द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT