Shivani Didi : मनाची पॉवरबँक रोज रिचार्ज करा; शिवानी दीदींनी दिला आनंदी जीवनाचा मंत्र ! file photo
लातूर

Shivani Didi : मनाची पॉवरबँक रोज रिचार्ज करा; शिवानी दीदींनी दिला आनंदी जीवनाचा मंत्र !

दयानंद शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने 'रिचार्ज युवर लाईफ' उत्साहात; दहा हजारांची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

Recharge your mind’s ‘power bank’ every day; Shivani Didi shares the secret to a happy life!

लातूर, पुढारी वृत्तसेवा : मोबाईल आणि इतर उपकरणे नियमित चार्ज करतो, त्याचप्रमाणे मनाची ऊर्जा टिकविण्यासाठी दररोज ध्यान, आत्मचिंतन आणि सकारात्मक विचारांनी मनाची पॉवरबँक रिचार्ज करणे आवश्यक आहे. अनावश्यक विचारांना थारा न देता शांतता, सद्भावना आणि श्रेष्ठ कर्माचा मार्ग स्वीकारला, तर जीवन आनंदी होऊ शकते, असा जीवनमंत्र प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सुप्रसिद्ध वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांनी दिला.

दयानंद शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने संस्थेच्या भव्य प्रांगणात आयोजित 'रिचार्ज युवर लाईफ' या प्रेरणादायी प्रवचन सोहळ्यात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला सुमारे दहा हजार लातूरकरांची उपस्थिती लाभली. राजयोगी स्वर, उत्सव आणि कथक नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

शिवानी दीदी म्हणाल्या, शांतता हा आत्म्याचा मूळ स्वभाव आहे. देहाभिमानातून बाहेर पडून प्रत्येकाने आत्मिक शक्ती ओळखली पाहिजे. 'मी' पणाची भावना सोडून 'वसुधैव कुटुंबकम्' या विचाराने संपूर्ण विश्वाला आपले कुटुंब मानण्याची वृत्ती जोपासली पाहिजे. प्रत्येक आत्मा दिव्य असून, सगुण आणि देण्याची वृत्ती यांमधून जीवन समृद्ध होते. विचार, भावना, शब्द आणि व्यवहार यांतून कर्म घडते आणि त्यातूनच भाग्य निर्माण होते.

त्यामुळे प्रत्येकाने श्रेष्ठ काँचा संकल्प करावा. स्वतःचा आनंद, निरोगी शरीर आणि सुदृढ नातेसंबंध जपण्यासाठी सकारात्मक विचारांची कास धरावी, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला खासदार शिवाजीराव काळगे, आमदार अमित देशमुख, आमदार प्रवीण स्वामी, मनपा आयुक्त जयश्री सोनकांबळे, संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष ललितभाई शहा, सचिव रमेश बियाणी, विशाल लाहोटी, अॅड. श्रीकांत उटगे, अजिंक्य सोनवणे, संजय बोरा, ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका नंदा दीदी, उपसंचालिका पुण्य दीदी यांच्यासह संस्थेचे नियामक सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाईलचा वापर मर्यादित ठेवा

मोबाईलच्या अतिवापरामुळे मनाची चंचलता वाढत असून, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण स्क्रीनच्या आहारी जात आहेत. मुलांशी संवाद साधताना पालकांनी स्वतः ही मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा. सततचे ओव्हर थिंकिंग टाळून मनाला विश्रांती द्यावी, असे आवाहन शिवानी दीदी यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT