Latur Rain : लातूर जिल्ह्यात अखेर वरुणराजाचे आगमन file photo
लातूर

Latur Rain : लातूर जिल्ह्यात अखेर वरुणराजाचे आगमन

लातुरात हलक्या सरी, उदगीर, औसा, निलंगा धो-धो बरसला; बळीराजा सुखावला

पुढारी वृत्तसेवा

Rain finally arrives in Latur district

लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर शहर व जिल्ह्यात बुधवारी मोसमी पावसाचे आगमन झाल्याने नागरिक सुखावले. औसा, निलंगा व उदगीर तालुक्यात जोरदार पाऊस झाला त्यामुळे तेथे पेरणी सुरू होण्याची आशा बळावली आहे. दरम्यान गेली अनेक दिवसांपासून उष्णतेने त्रासलेल्या नागरिकांना या पावसाने गारवा दिला असून ते सुखावले आहेत. लातूर जिल्ह्यात मृग नक्षत्रात पावसाच्या सरी बरसतात व शेतकरी चाड्यावर मूठ धरतो. मात्र गेली काही वर्षापासून पावसाची हजेरी मृग नक्षत्रात अभावानेच लागत आहे.

असे असले तरी मृग नक्षत्रात झालेल्या पेरणीने पिके जोमदार येतात व उत्पन्नही दमदार निघते असे शेतकरी सांगतात त्यामुळेच त्यांना मृगातील पावसाची प्रतीक्षा असते. या अंदाजावर याही वर्षी शेतकऱ्यांनी पेरणीची जोरदार तयारी केली आहे मात्र पावसाअभावी ती लांबत आहे. बुधवारी दुपारी लातूर शहरात पावसाचे आगमन झाले. मात्र तो हलक्या स्वरूपात अंतरा अंतराने बरसला. केवळ या पावसावर हवामान पेरणी होणार नसली तरी वातावरणातील उष्णता शमवण्यास त्याने मोठा हातभार लावला आहे. हा आठवडा पावसाचा असल्याचा अंदाज अनेक जण वर्तवत असल्याने पेरणी सुरुवात होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे

औसा, पुढारी वृत्तसेवाः जून महिन्याचे 23 दिवस प्रचंड उष्णतेचे आणि कडक्याच्या उन्हाचे गेले. मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. पण महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात अखेर मान्सूनने औसा तालुक्यात दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील शिवार चिंब भिजले असून, अनेक दिवसांपासून आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान झळकले आहे.

यंदा मृग नक्षत्राचा कालावधी संपत आला तरी समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. नांगरणी, वखरणी व शेतीची इतर पूर्वतयारी पूर्ण करून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. पावसाच्या विलंबामुळे बियाणे, खतांची तयारी करून बसलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत होती.

मात्र बुधवारी झालेल्या दमदार पावसाने ही चिंता काही प्रमाणात दूर केली. औसा तालुक्यातील जवळगा पो. दापेगाव, नागरसोगा, किल्लारी, मातोळा, भादा, बेलकुंड, आलमला भागात जवळपास एक तास कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाण्याचे प्रवाह वाहू लागले, तर शिवारातील काळ्या मातीत चांगला ओलावा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी थांबले. त्यामुळे आता शेतकरी खरीप पेरणीच्या कामांना वेग देण्याच्या तयारीत आहेत. तर औसा शहरातील गटारीतील पाणी अनेक ठिकाणी तुंबून रस्त्यावर आले होते. गतवर्षी वेळेवर झालेल्या पावसाने शेतीला चांगली साथ दिली होती. यंदाही मान्सूनची अशीच कृपादृष्टी कायम राहिल्यास खरीप हंगाम बहरण्याची आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

प्रचंड उकड्यापासून सुटका

गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना बुधवारी अचानक झालेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेचा तडाखा कमी झाला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून शेतकरी वर्गातही आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. उशिराने आलेल्या या पावसाने औसा तालुक्यात नवचैतन्य निर्माण केले असून, कोरड्या धरतीला आणि चिंताग्रस्त बळीराजाला दिलासा देणारी ही पावसाची पहिली दमदार सलामी ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT