Only enough fodder for 80 days; crisis over saving livestock
शहाजी पवार
लातूर : पावसाने पाठ फिरवली, शेतातील सोयाबीन करपले, ज्वारीचा कडबा घटला आणि जलस्रोतांनी तळ गाठला. आता माणसांसोबत मुक्या जनावरांच्याही जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दावणीला बांधलेल्या पशुधनासाठी चारा आणायचा कुठून आणि तहान भागवायची कशी? असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
जिल्ह्यात उपलब्ध चारा जेमतेम ८० दिवस पुरेल, एवढाच असल्याने त्यानंतर पशुधन जगवायचे कसे? ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. जलस्रोत आटत असल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. काही गावांमध्ये जनावरांनाही टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येण्याची शक्यता असून, त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पाणीपुरवठा विभागाशी समन्वय साधून नियोजनही सुरू केले आहे.
खरीप पिकांच्या नुकसानीने आधीच आर्थिक कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांवर आता जनावरांच्या चारा-पाण्याचे नवे संकट ओढवले आहे. जिल्ह्यात सुमारे तीन लाख ६० हजार गाय-म्हशी, तर दीड लाख शेळ्या-मेंढ्या आहेत. एका प्रौढ जनावराला जगवण्यासाठी दररोज साधारण सहा किलो चारा आणि ४० लिटर पाणी लागते. जिल्ह्यातील पशुधनासाठी दररोज दोन हजार मेट्रीक टन चारा लागतो.
मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने चारा उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. सोयाबीन हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून, त्याच्या फांद्या आणि पानांचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी केला जातो. एकुण चारा उत्पादनाच्या तब्बल २० टक्के चारा यातून मिळतो. परंतु सोयाबीन करपल्याने चाऱ्याचा हा प्रमुख स्रोत आटला आहे.
ज्वारी, तूर ऊसही वाळत असून गव्हाच्या पेऱ्याची शक्यता नसल्याने व पर्यायी चाऱ्याचे स्रोतही कमी झाले झाल्याने अपेक्षीत चारा मिळण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. दरम्यान पशुसंवर्धन विभागाकडून चारा व पाणीपुरवठ्याबाबत आराखडा तयार केला जात असून, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आज पालकसचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या आढावा बैठकीत या प्रश्नांवर ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
म्हैसकरांबद्दल लातुरकरांना खात्री
कठीण प्रसंगी प्रशासनाचा निर्णय म्हणजे केवळ कागदावरील आदेश नव्हे तर संकटात सापडलेल्या हजारो कुटुंबांसाठी मोठा आधार असतो. पालक सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर या अनुभवी व संवेदनशिल अधिकारी आहेत. त्यांना जनप्रश्नांची जाण व ते सोडवण्याची हातोटी आहे. सांमान्य जनेतेप्रति त्यांची असलेली बांधिलकी महाराष्ट्राने अनकवेळा अनुभवली आहे. लातूर जिल्ह्यावर त्यांचे विशेष लक्ष आहे, हे पहाता दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर आज त्या घेत असलेल्या आढावा बैठकीतील वास्तव दिलासादायक निर्णयासाठी शासदबारी संवेदनशिलपणे मांडतील अशी लातूरकरांना आशाच नाही तर खात्रीही आहे.
जळजळीत वास्तव
जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाईही तीव्र होत आहे. मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्पांतील पाणीसाठे घटले असून बरेच तलाव आणि बंधारे कोरडे पडत आहेत. विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालावल्याने अनेक गांवात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी माणसांबरोबरच जनावरांचीही परवड होण्याची भीती आहे. त्यामुळे काही गावांमध्ये जनावरांनाही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. पशुधन हे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. दुधाच्या उत्पन्नातून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. चारा आणि पाणी उपलब्ध न झाल्यास जनावरांच्या आरोग्यावर, क्रयशक्तीवर आणि दूध उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे.