Only 15 percent water storage in the Rena project
रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : रेणापूर तालुक्यातील अर्ध्या तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रेणा मध्यम प्रकल्पात सध्या केवळ १५ टक्के जीवंत जलसाठा शिल्लक आहे. नोव्हेंबर महिन्यातच धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने आगामी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज असताना रेणापूर शहरात मात्र हजारो लिटर पाण्याची उघडपणे नासाडी होत आहे.
शहरातील बहुतांश नळांना तोट्या नसल्याने पाणी भरणे झाल्यानंतरही नळ सुरूच राहतात. अनेक ठिकाणी मोठे खड्डे करून त्यात विद्युत मोटारी बसवून पाणी घेतले जाते. त्यानंतर वाहणारे पाणी गटारींतून वाया जाते.
काही नागरिक रस्त्यावर धुणे धुणे, अंगण धुणे तसेच दुचाकी व चारचाकी वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करतात. यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतरही रेणा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा जमा होण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडतो.
त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यांत पाणीपुरवठ्याचे नियोजन कसे करणार, धरणातील साठा संपल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करणार का, तोट्या नसलेल्या नळधारकांवर दंडात्मक कारवाई करणार का, असे प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. नगरपंचायतीने नळांना तोट्या बसविणे सक्तीचे करावे, पाण्याची नासाडी रोखण्यासाठी जनजागृती करावी आणि पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धर्तीवर स्वतंत्र वॉर रूम स्थापन करावी, अशी मागणी होत आहे.
मुख्य पाइपलाइनमधूनही गळती
रेणापूर शहराची मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन संभाजीनगर परिसरातून जाते. या भागातील विविध ठिकाणी पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. याबाबत नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही दुरुस्ती होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तातडीने गळती रोखली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे
वॉर रूमची गरज
संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध जलसाठा, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक, गळती, टँकरची आवश्यकता आणि पर्यायी स्रोत यांचे नियोजन एकाच ठिकाणाहून करता यावे, यासाठी नगरपंचायतीने वॉर रूम स्थापन करावी. त्यातून तातडीने निर्णय घेऊन पाणीटंचाईचे व्यवस्थापन करणे शक्य होईल. ऐन उन्हाळ्यात धावपळ करण्यापेक्षा आतापासूनच नियोजन करण्याची गरज आहे.