NEET Paper Leak Scandal: CBI Has Been in Latur for Two Weeks
लातूर, पुढारी वृतसेवा नीट पेपरफुटीची पाळेमुळे लातूर शहर व शेजारील बीड जिल्ह्यातही पसरल्याने सीबीआय अधिक सतर्क व गतिमान झाली आहे. या प्रकरणाचा कसून तापास होत असून, सीबीआयच्या ताब्यात असलेले लातूरचे आरोपी प्रा. पी. व्ही. कुलकर्णी, शिवराज मोटेगावकर व डॉ. मनोज शिरुरे यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीवरून या प्रकरणाचा विस्तार कळण्यास मदत होत आहे.
नीट युजी पेपरफुटी प्रकरणात लातूर पोलिस अधिक्षकांकडे १२ मे रोजी एका पालकाने तक्रार दिली होती. त्यानंतर त्या क्लासेसची चौकशी करण्यात आली होती. १४ मे रोजी सीबीआयचे पथक लातुरात दाखल झाले होते.
प्रारंभी येथील सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांच्या घरावर छापा टाकून त्यांना पुणे येथे अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतर येथील आरसीसी क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या घराची १५ मे रोजी झाडाझडती झाली होती. मोटेगावकरांना पुणे येथे बोलावून त्यांना १८ मे रोजी अटक करण्यात आली होती.
या अटकेनंतर काही दिवसांत लातूर शहरातील डॉ. मनोज शिरुरे व अन्य एका डॉक्टरच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. मोटेगावकर यांच्या मुलांचाही जबाब नोंदवण्यात आला होता. डॉ. मनोज शिरुरे यांच्या या अटकेनंतर सीबीआय पथकाने दोनदा आरसीसी क्लासची तपासणी केली होती. हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांचीही चौकशी केली होती.