पुढारी ऑनलाईन डेस्क : नीट (NEET) पेपर फुटी प्रकरणातील लातूर जिल्ह्यातील संशयित संजय जाधव आणि जलील पठाण यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे, त्यामुळे तुर्त या दोघांचा मुक्काम तुरुंगात असणार आहे.
NEET पेपर फुटी प्रकरणी संजय तुकाराम जाधव (रा. लातूर) आणि जलीलखाँ उमरखाँ पठाण यांना प्रारंभी स्थानिक पोलिस आणि त्यानंतर सीबीआयने अटक केली होती. सध्या हे दोघेही न्यायलयनी कोठडीत आहेत. या दोघांनी लातूरच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यावर सीबीआयने गुरुवारी न्यायालयात म्हणणे मांडले.
सीबीआयचे अधिकारी कुणाल अरोरा यांनी या प्रकरणाचा तपास अतिशय निर्णायक वळणावर आला असून तपासादरम्यानच्या आरोपींच्या वर्तनावरुन तसेच मिळालेल्या माहिती व पुराव्यावरुन त्यांना न्यायालयीन कोठडीतच ठेवणे योग्य आहे, अशी भूमिका मांडली.
त्यांना जामीन दिला तर ते साक्षीदांरास फितवू शकतात, पुरावे व नोंदी नष्ट करु शकतात. या प्रकरणाची पाळेमुळे विस्तारली असून जाधव व पठाण हे अन्य राज्यातील संशयितांच्या संपर्कात होते असे तपासादरम्यान आढळले आहे, असेही म्हणणे अरोरा यांनी मांडले. सीबीआयचे म्हणणे ग्राह्य धरत न्यायालयाने जाधव आणि पठाण यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.