NEET paper leak case
नीट परीक्षा ( NEET UG 2024) पेपर फुटीप्रकरणातील संशयित फरार इराण्णा कोनगलवारचा अटकपूर्व जामीन फेटाळला. File Photo
लातूर

NEET paper leak | नीट पेपरफुटी प्रकरण: इराण्णा कोनगलवारचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुढारी वृत्तसेवा

लातूर, पुढारी वृत्तसेवा : नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सुत्रधार आणि सध्या फरार असलेला संशयित इराण्णा मष्णाजी कोनगलवार याचा अटकपूर्व जामीन लातूरच्या न्यायालयाने शनिवारी (दि.२०) फेटाळला. ५ जुलैराजी इराण्णाने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. शुक्रवारी (दि.१९) त्या अर्जावर दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून निकाल न्यायाधिशांनी राखीव ठेवला होता.

इराण्णा कोनगलगावार उमरगा येथील आयटीआयमध्ये कार्यरत

इराण्णा कोनगलगावार हा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआयमध्ये कार्यरत होता. नीटच्या पेपरफुटीत सहभाग असल्याच्या संशयावरुन नांदेड एटीएसने त्याची चौकशी करुन त्याला सोडून दिले होते. तथापि गरज भासल्यास बोलावले जाईल. त्यामुळे कोठेही जावू नका, असे त्याला बजावले होते. तथापि त्या दिवसांपासूनच इरान्ना फरार होता. याच प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेला संजय जाधव हा पैशाच्या मोबदल्यात परीक्षेत पास करण्याची हमी देऊन अनेक विद्यार्थ्यांची प्रवेश पत्रे इरन्ना कोनगलवार याला व्हॉट्सअॅपवरुन पाठवत होता. इराण्णा हा गंगाधरच्या माध्यमातून पैशाच्या मोबदल्यात गुणवाढ करुन देण्याचे काम करीत होता.

अन्य आरोपी इराण्णाच्या संपर्कात होते

या प्रकरणात अन्य आरोपी इराण्णाच्या संपर्कात होते. विशेष म्हणजे २०२३ पासून इरण्णा व गंगाधर हे एकमेकांच्या संपर्कात होते. इराण्णाच्या मुलीचे गुण वाढविण्यासाठी १५ लाख रुपये देण्याचे त्यांच्यात ठरले होते. शिवाय इरण्णासह जाधव, पठाण आणि गंगाधरने अनेकांकडून पैसे घेतल्याची कबुली गंगाधरने दिली आहे. इरण्णा या प्रकरणातील महत्वाचा दुआ असून त्याला अटक झाल्याशिवाय या प्रकरणाचे धागेदोरे मिळणार नाहीत, म्हणून त्याला जामीन देऊ नये, असे सीबीआयचे वकील मंगेश महिद्रकर यांनी बाजू मांडताना सांगितले होते. तर पोलिसांना सर्व माहिती दिली असल्याने जामीन अर्ज मंजूर करावा, अशी बाजू इराण्णाच्या वकिलांनी मांडली होती.

SCROLL FOR NEXT