लातूर : पिता आपल्या बाळाला बोट धरून चालायला शिकवितो अगदी अशीच माया राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर केली. त्याला अपवाद लातूर जिल्ह्यातील अनेक सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत. दादांचे निधन झाल्याची वार्ता समजताच “आमचा देव गेला...“ अशा भावना कंठ दाटून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अश्रूंद्वारे बोलत्या केल्या.
मुंबईहून बारामतीकडे येताना विमान अपघातात दादांचे निधन झाल्याचे वृत्त धडकताच कार्यकर्त्यांचा विश्वास बसेनासा झाला. एकमेकांना पुन्हा कोणी आणि आपापल्या पदाधिकाऱ्यांकडे विचारपूस करून खात्री होताच कार्यकर्ते सैरभैर झाले. काय करावे काही सुचेना. लातूर जिल्ह्यात अजितदादांनी अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी घडविले.
यामध्ये विद्यमान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, शिक्षक आमदार विक्रम काळे, सर्वसामान्य कार्यकर्ते ते थेट राज्याची कॅबिनेट मंत्री असा प्रवास घडविलेले आमदार संजय बनसोडे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लातूर येथे आमदार विक्रम काळे यांच्या निवासस्थानी सकाळी शोक सागरात बुडाले.
संजय बनसोडे यांना अश्रू अनावर झाले आणि “देव गेला“ म्हणत धायमोकलून मंत्री बाबासाहेब पाटील आणि आमदार विक्रम काळे यांच्या गळ्यात पडून रडू लागले. त्यावेळी कार्यकर्त्यांचाही हे दृश्य पाहून कंठ दाटून आला.