Nana's exit was heartbreaking; Remembrance of commitment, memories awakened by Laturkar
लातूर, पुढारी वृत्तसेवा: जगात माणसे येतात अन् जातात पण अंतःकरणात घर केलेल्या माणसाचे अकाली जाणे काळजाला पीळ पाडणारे असते सीनेअभिनेते तथा समाजसेवक नाना पाटेकरांची अकाली एक्झिट हेच पुन्हा एकदा सिध्द करून गेली. अनेक आपत्तीत नाना लातूरकरांसाठी धावून आले त्यांनी दिलेला आधार पुरवलेली मदत आठवताना कृतज्ञतेबरोबर लातुरकरांच्या अंतःकरणात हळहळही दाटून आली.
नामचे लातूर व धाराशिव जिल्ह्याचे समन्वयक स्वयंसेवक डॉ. हर्षवर्धन राऊत, विलास चामे, ज्ञानेश्वर चेवले, विश्वनाथ खंदाडे व सुधिर माने यांनी नानांच्या सेवाकार्याच्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले, "नानांच्या निस्वार्थी सेवाकार्याशी आमचा जवळचा परिचय होता. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता.
मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे, ही त्यांची स्पष्ट भूमिका होती. मराठवाड्यातील शेतकऱ्यांबद्दल नानांना विशेष आस्था होती. संकटांनी आणि परिस्थितीने अडचणीत आलेला शेतकरी पुन्हा उभा राहावा, यासाठी ते सातत्यानेप्रयत्नशील राहिले. स्वतःच्या गरजा मर्यादित ठेवून मिळकतीतील मोठा वाटा त्यांनी समाजसेवेसाठी दिला. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणा आणि परतफेडीच्या चिंतेतून आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.
त्यांच्या पश्चात कुटुंबीयांसमोर उभ्या राहिलेल्या आर्थिक आणि सामाजिक संकटात नाम फाउंडेशनने आधार दिला. या कुटुंबांच्यामदतीसाठी नाना स्वतः लातूरमध्ये आले होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परीवारांची प्रत्यक्ष संवाद साधून त्यांनी त्यांना धीर दिला. मी तुमचाच आहे.. त्यांच्या या आपुलकीच्या शब्दांनी संकटात सापडलेल्या कुटुंबांना मोठा मानसिक आधार मिळाला.
अशा कुटुंबांना पुन्हा उभे करण्यासाठी मदत करण्याबरोबरच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनेक मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही नाम फाउंडेशनने घेतली. नानांच्या सेवाकार्यातील हा माणुसकीचापैलू त्यांच्या जाण्यानंतरही अनेक कुटुंबांच्या आयुष्यात कायम स्मरणात राहील, अशी भावना या सेवकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे. तो सुखी आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबीव्हावा, यासाठी नाना शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले, मिळालेल्या उत्पन्नातील मोठा हिस्सा त्यांनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी खर्च केला.
लातूर शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील हजारो महिलांना नामफाउंडेशनच्या माध्यमातून नानांनी शिलाई मशीन उपलब्ध करून दिल्या. आजही या मशीनच्या माध्यमातून अनेक महिला कुटुंबाच्या उत्पन्नाला हातभार लावत आहेत. कोविडच्या काळात रोजच्या मोलमजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कष्टकऱ्यांसमोर अन्नाचा प्रश्न निर्माण झाला होता.
त्या वेळी नानांनी धान्याची हजारो किट पाठवून दिली. ती गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यात आली. गेल्या वर्षी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. रब्बी हंगामासाठी बियाण्यांची चिंता असताना नानांनी हजारो गोणी बियाणे पाठवून दिले.
अनेक भूमिका साकारल्या; नानाची भूमिका जगली
वडीलधाऱ्या व्यक्तीला आपण प्रेमाने 'नाना' म्हणतो.. नानांनी चित्रपटांत अनेक भूमिका साकारल्या; मात्र समाजासाठी 'नाना' म्हणून त्यांनी जगलेली भूमिका त्यांच्या नावाला अन् नात्याला खऱ्या अथनि न्याय देणारी ठरली. अशा माणसाचे अकाली जाणे ही सर्वांसाठीच वेदनादावी पोकळी असल्याची भावना लातूरकरांनी व्यक्त केली.