Municipal Corporation's 'strike' on plastic bags, 950 kg of plastic seized
लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसात प्लास्टिक विरोधात जप्तीची मोहीम राबविण्यात येत आहे. रविवारीही मोहीम सुरू होती. या अंतर्गत शहरातील १८ प्रभागात एकाच वेळी धाडी टाकून ९५० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून १ लाख ६५ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.
मनपाच्या स्वच्छता विभागाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून शहरात बंदी असणाऱ्या सिंगल युज प्लास्टिक वापरा विरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत प्लास्टिक विक्री करणारे तसेच वापर करणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. या मोहिमेत आतापर्यंत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
या मोहिमेला गती देण्यासाठी मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी शहरातील १८ प्रभागात एकाच वेळी प्लास्टिक जप्ती मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रत्येक प्रभागात एक अधिकारी व स्वच्छता निरीक्षक आणि त्यांच्या सोबतीला सात ते आठ कर्मचारी असे गट करून जप्तीची मोहीम राबविण्यात आली. पालिका उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी या मोहिमेचे नियोजन करत कारवाईला अंतिम रूप दिले. एकाच वेळी शहराच्या विविध भागात प्लास्टिक विक्रेत्यावर धाडी पडल्या.
यात ९५० किलो प्लास्टिक पालिकेने जप्त केले. संबंधितांना १ लाख ६५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. सिंगल युज प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. शासनाकडून अशा प्लास्टिकवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी या प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करून पर्यावरण रक्षणास मदत करावी, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. प्लास्टिक विरोधातील मनपाची मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. त्यामुळे व्यावसायिक आणि नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.